अनिश पाटील

बेकायदा परदेशी चलन थायलंडला घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या सहा परदेशी नागरिकांना सीमाशुल्क विभागाने नुकतीच अटक केली. त्यांच्याकडून सुमारे साडेतीन कोटी रुपये किमतीचे परदेशी चलन जप्त करण्यात आले. बँकॉक व दुबई परदेशी चलन तस्करीचे केंद्रस्थान झाले आहे. या तस्करीत अनेक परदेशी टोळय़ा सक्रीय असून त्या मागे हवाला व्यवसायिकांचा हात असल्याचा केंद्रीय यंत्रणांना संशय आहे.

मुंबई विमानतळावरून फॅपाफस चारॉयनिथी (२७), नेपत चारॉयनिथी (२५), कोटाचफस चारॉयनिथी (२७) व जिनतारा साईया (३४) या चार महिलांना १० जुलै रोजी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन लाख ८० हजार अमेरिकन डॉलर्स जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत दोन कोटी २८ लाख ३४ हजार रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आरोपी महिला मुंबईवरून थायलंडला जात होत्या. त्यावेळी फॅपाफस चारॉयनिथी या महिलेच्या बॅगेची तपासणी केली असता ९० हजार अमेरिकन डॉलर्स सापडले. त्यानंतर तिच्या आडनावाशी साम्य असलेल्या दोन महिलांकडेही प्रत्येकी ५० हजार अमेरिकन डॉलर सापडले. साईया हिच्याकडूनही ९० हजार अमेरिकन डॉलर जप्त करण्यात आले. चौकशीनंतर १० जुलै त्यांना अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात सीमाशुल्क कायदा व फेमा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई विमानतळावर ९ व १० जुलै या दोन दिवसांत सहा परदेशी नागरिकांना परदेशी चलनासह अटक करण्यात आली. या कारवाईत सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे परदेशी चलन जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत थायलंडमधील पाच व जपानमधील एका नागरिकाला अटक करण्यात आली. चार परदेशी महिलांना अटक करण्यापूर्वी ९ जुलैला मकोटो टानी (४७) व गुन्यापुनईसा फूनासेट (४१) या दोघांना परदेशी चलनासह अटक करण्यात आली होती. यातील टानी हा जपानमधील ओसाका येथील रहिवासी आहे, तर फूनासेह ही महिला थायलंडमधील बँकॉक येथील रहिवासी असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. दोघांकडून १०० अमेरिकन डॉलरच्या १,४१५ नोटा जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत एक कोटी १५ लाख ३९ हजार रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारतात परदेशी चलनाच्या तस्करीला रोखण्यासाठी सीमाशुल्क विभाग व महसूल गुप्तवार्ता संचलनालय (डीआरआय) कार्यरत आहेत. या तस्करीला रोखण्यासाठी सीमाशुल्क कायद्यासह फेमा कायदा अस्तित्त्वात आहे. बदलत्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत १९९९ मध्ये फेरा रद्द करून त्या जागी फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अ‍ॅक्ट(फेमा) लागू करण्यात आला होता. तो १ जून २००० पासून लागू झाला होता. करोनानंतर देशातून परदेशी चलनाच्या तस्करीत पुन्हा वाढ झाली असून त्यासाठी परदेशी तस्करांचा मोठय़ाप्रमाणात वापर केला जात आहे.

परदेशी चलनाच्या तस्करीचे केंद्र असलेल्या दुबईप्रमाणे बँकॉकही परदेशी चलनाच्या तस्करीचे केंद्र होत आहे. मुंबईसह बंगळूरु, दिल्ली, चेन्नई, कोलकाता या प्रमुख शहरांमधून परदेशी चलनाची मोठय़ाप्रमाणात तस्करी केली जाते, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्यात परदेशी टोळय़ांसह भारतीय टोळय़ाही कार्यरत आहेत. त्यांचा सर्व समन्वय व्हॉट्सअ‍ॅपवरून चालतो. २०२१ मध्ये डीआरआयने परदेशी चलन तस्करी करणाऱ्या टोळीला अटक केली होती. त्यात विविध मेसेंजरच्या माध्यमातून या टोळय़ांमध्ये संभाषण व्हायचे. या टोळीचा सदस्य परिवदर सिंह याच्या चौकशीत त्याने किमान १२ वेळा परदेशी चलनाची तस्करी केल्याचे निष्पन्न झाले. तो आठ वेळा बँकॉक व चार वेळा शारजामध्ये गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. परदेशी चलन तस्करी करून घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक खेपेला ३० ते ४० हजार रुपये मिळायचे, असे चौकशीत उघड झाले होते. या संपूर्ण तस्करीमागे हवाला ऑपरेटरचा सहभाग असतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हवाला व्यवसाय हा पूर्ण पणे विश्वासावर चालतो. एखाद्या डीमांड ड्राफ्ट सुविधेप्रमाणे हा व्यवहार चालतो. त्यांचे जाळे देशासह परदेशातही पसरलेले आहे. मुंबईतून एखादी रक्कम गुजरातमध्ये पाठवायची असेल, तर मुंबईतील व्यक्ती हवाला दलालाला ती रक्कम देतो. ती रक्कम स्वीकारल्यानंतर गुजरातमधील दलाल कळवले जाते. त्यानंतर तो त्याच्याकडील रक्कम व्यवसायिकाला पुरवतो. या व्यवहारांमागे एका कोटी मागे एक टक्का, तर एका कोटी पेक्षा कमी रकमेवर दोन टक्के कमिशन आकारले जाते. परदेशातही असे व्यवहार होतात. कोणाला अमेरिकेत १००० डॉलर हवे असतील तर तो मुंबईत हवाला ऑपरेटर ७०००० रुपये देईल. हवाला ऑपरेटर त्याबदल्यात अमेरिकेतील किंवा मुंबईच्या एजंटला अमेरिकन डॉलर देतो. हा सर्व व्यवहार एका डायरीवर लिहिला जातो. सध्या त्यासाठी लॅपटॉपचाही वापर होतो. या प्रकारात दोन्हीकडून पैशांचा व्यवहार होतो त्यामुळे यात सरकारी कराची आणि इतर कर बुडवले जातात. रोखीने व्यवहार होत असल्यामुळे हवाला व्यवसाईकांना मोठय़ा प्रमाणात परदेशी चलन विशेष करून अमेरिकन डॉलरची आवश्यकता असल्यामुळे परदेशी चलनाची मोठय़ाप्रमाणात तस्करी केली जाते. करोनानंतर बँकॉकमधील हवाला टोळय़ांकडे परदेशी चलनाचा मोठा तुडवडा निर्माण झाला होता.