मुंबई : शिवडीमधील जैन मंदिरातील सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणार्या त्रिकुटाला रफी अहमद किडवाई मार्ग (आरएके) पोलिसांनी गुजरातमधून अटक केली. पोलिसांनी ७० हून अधिक सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रणाची पडताळणी करून या टोळीला गजाआड केले.
श्री शिवडी जैन संघ यांच्या मालकिचे शिवडी येथे जैन मंदिर आहे. या मंदिरात २२ एप्रिल रोजी रात्री ८ च्या सुमारास चोरी करण्यात आली होती. अज्ञात आरोपींनी मंदिराचा दवाजा तोडून आतील सोन्या-चांदीचे दागिने आणि दानपेटीतील रक्कम असा एकूण ७ लाखांचा ऐवज लुटून नेला. चोरी करण्यापूर्वी आरोपींनी मंदिरातील सीसी टीव्ही कॅमेरा आणि त्याच्या डिव्हीआरच्या वायरी कापल्या होत्या. त्यामुळे आरोपींची ओळख पटवणे आव्हान बनले होते.
आरएके ( रफी अहमद किडवाई) मार्ग पोलिसांनी मंदिर परिसरात येण्या-जाण्याच्या २९ मार्गांवरील सुमारे ७० हून अधिक सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रणाची तपासणी केली. हे आरोपी गुजरातच्या बनासकंठा जिल्ह्यातील दांतिवाडा तालुक्यातील भाकरमोटी गावात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने भाकरमोटी गावात जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचला आणि तीन आरोपींना अटक केली.
सुनिलसिंह दाभी (२३) राहुलसिंग वाघेला (२०) जिगरसिंग वाघेला (१९) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपींनी चोरीलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. आरएके मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप ऐदाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मोहीते, गोविंद खैरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.