मुंबई : फेसबुकवर एका महिलेचे छायाचित्र प्रसारित केल्यामुळे झालेल्या वादातून तिघांवर बुधवारी चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हाणामारीत हल्लेखोरही जखमी झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बोरिवली (पश्चिम) येथील एमएचबी पोलीस ठाण्याला लागूनच ‘शिववडा’ नावाची वडापाव विक्रीची गाडी आहे. यादव नावाचे कुटुंबिय ही वडापाव विक्रीची गाडी चालवतात. सचिन यादव (१८) त्याचे काका राजेश यादव, चुलत भाऊ शिवम, तसेच मदतनीस रामधनी यादव हे तेथे काम करतात. पूर्वी त्यांच्याकडे पवन दुबे (२७) मदतनीस म्हणून काम करीत होता. त्यांच्यात किरकोळ गोष्टींवरून वाद झाल्याने तो काम सोडून निघून गेला होता.
फेसबुकवर छायाचित्र प्रसारित का केले ?
काही दिवसांपूर्वी राजेश यादवने कांचन दुबे (४०) या महिलेचे छायाचित्र फेसबुकवर प्रसारित केले होते. ही महिला काम सोडून गेलेला मदतनीस पवन दुबे याच्या परिचयाची होती. आधीच यादव आणि दुबे यांच्यात वाद झाले होते. त्यात महिलेचे छायाचित्र सार्वजनिक केल्याने वादाचा भडका उडाला. त्याबद्दल मागील आठवड्यात दुबे याने जाब विचारला होता. त्यानंतर फेसबुकवरून ते छायाचित्र हटविण्यात आले होते. वाद शमला असला तरी धुसफूस कायम होती. सोमवारी या मुद्द्यावरून पुन्हा यादव आणि दुबे यांच्यात वाद झाला होता. यावेळी यादव कुटुंबियांनी अर्वाच्च शब्दात दुबे याचा अपमान केला.
अपमानाचा बदला घेण्यासाठी हल्ला
यादव कुटुंबियांनी केलेला अपमान पवन दुबेच्या जिव्हारी लागली होता. दुबे बुधवारी सकाळी वडापावच्या गाडीवर आला. फेसबुकवर छायाचित्र का प्रसारित केले असा जाब त्याने विचारला. अचानक त्याने चाकू काढला आणि राजेश यादव याच्या पोटात चार-पाच वार केले. त्याला वाचविण्यासाठी सचिन यादव, त्याचा भाऊ शिवम आणि रामधन धावले. दुबेने त्यांच्यावरही चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले. यावेळी झालेल्या हाणामारीत दुबेही जखमी झाला. जखमींवर कांदिवलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हल्लेखोराविरोधात गुन्हे दाखल
या प्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हेगारी कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोर दुबे सध्या रुग्णालयात असून त्याला नंतर अटक केली जाईल, अशी माहिती एमएचबी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश तारगे यांनी दिली.