मुंबई : महाविद्यालयातील एका प्राचार्याने १७ वर्षीय विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी दहिसरच्या एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील एक वर्षापासून आरोपी प्राचार्य या विद्यार्थिनीवर प्रेमसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकून तिचा लैंगिक छळ करीत होता.
एमएचबी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ३७ वर्षीय असून एका कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य आहे. या महाविद्यालयात १७ वर्षांची पीडित विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे. मागील एक वर्षांपासून हा प्राचार्य तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होता. सतत तिच्याशी अश्लील संभाषण करीत होता.
पीडितने त्याच्याशी प्रेमसंबंध ठेवावे यासाठी तो सतत तिच्यावर दबाव टाकत होता. अखेर हा प्रकार असह्य झाल्याने तिने याबाबत कुटुंबियांना सांगितला. त्यांनी एमएचबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल केला. आम्ही पीडित विद्यार्थिनीचा जबाब नोंदवला आहे. याशिवाय महाविद्यालयातील अन्य विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले जातील, घटनास्थळावर बसविलेल्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण तपासण्यात येईल, असे एमएचबी पोलिसांनी सांगितले.