मुंबई : धार्मिक स्थळांवरील ध्वनीक्षेपकाच्या वापराविरुद्ध मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर २४ दर्ग्यांनी गुरूवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच, अजानसाठी परवानगी योग्य आवाजात ध्वनीक्षेपक वापरू देण्याची परवानगी देण्याची मागणी केली. न्यायालयाने या याचिकेची दखल घेऊन सरकाला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

हजरत ख्वाजा गरीब नवाब वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने या २४ दर्ग्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी, परवानगीयोग्य आवाजात अजानसाठी ध्वनीक्षेपकाचा वापर करू देण्याची मागणी याचिकाकर्त्यांतर्फे वरिष्ठ वकील युसुफ मुच्छाला यांनी न्यायालायाला दिली.

तसेच, ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या धार्मिकस्थळांवरील ध्वनीक्षेपक हटवण्याच्या मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेला मुंबईतील अन्य पाच दर्ग्यांनी यापूर्वीच आव्हान दिले आहे. त्याचप्रमाणे त्यांची याचिका अन्य खंडपीठापुढे प्रलंबित असल्याचेही मुच्छाला यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने त्याची दखल घेतली व एकाच आशयाच्या याचिकांवर वेगवेगळा निर्णय देणे टाळण्यासाठी या दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले. त्यानंतर या प्रकरणी सरकारने दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करावी, असे आदेशही न्यायालयाने दिले.

तत्पूर्वी, याचिकाकर्त्यांनी समुदायातील सदल्याना याचिकेवरील सुनावणीसाठी उच्च न्यायालयात येण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, न्यायालयात आवारात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समुदायाच्या सदस्यांनी गर्दी केली आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे सरकारी वकील पूर्णिमा कंथारिया यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने त्याची दखल घेऊन या प्रकाराची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी बाळगण्याची समज याचिकाकर्त्यांना दिली.

उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धार्मिकस्थळांवरील बेकायदा ध्वनीक्षेपक हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, मुंबई पोलिसांनी ध्वनीक्षेपक हटवण्याची मोहीम सुरू केली होती. त्याचाच भाग म्हणून मुंबईतील दर्ग्यांना पोलिसांनी नोटीस बजावली होती. या कारवाईविरोधात दर्ग्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच, ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियमांच्या निकषांनुसार प्रत्येक व्यक्ती आणि समुदायाला त्यांच्या धर्माचे आचरण करण्याचा अधिकार आहे. अजान हा मुस्लिम धर्माचा एक महत्त्वाचा भाग आहे. मुंबईसारख्या शहरात नमाज पढण्यासाठी समुदायातील नागरिकांना पाचारण करण्याकरिता ध्वनीक्षेपकाचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे, कायद्याने परवानगीयोग्य आवाजात अजानसाठी ध्वनीक्षेपक वापरू देण्याची परवानगी देण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.