मुंबई : प्रेमसंबंधास विरोध केल्याने मुलीने आणि तिच्या प्रियकाराने वडिलांचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना अंधेरी येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आरोपी प्रियकरासह मुलीला अटक केली.

घाटकोपरच्या भटवाडी येथे राहणाऱ्या शंकर कांबळे (५८) यांची मोठी मुलगी सोनाली बाईत (३७) विवाहित असून तिला दोन मुले आहेत. मात्र ती पतीला सोडून २०२२ पासून महेश पांडे (२७) याच्यासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहात आहे. या अनैतिक संबंधाला कुटुंबियांचा विरोध होता. त्यावरून सोनाली आणि तिचे वडील शंकर कांबळे यांच्यात अधूनमधून वाद होत होते. याच कारणावरून ८ जून रोजी शंकर कांबळे आणि महेश पांडे यांच्यात वाद झाला. त्यावेळी महेश पांडे याने शंकर कांबळे यांना मारहाण केली होती.

अंधेरी कुर्ला रोड येथील महेश लंच होमसमोर सोनाली आणि महेश पांडे या दोघांनी ११ जून रोजी संध्याकाळी पुन्हा शंकर कांबळे यांना मारहाण केली. त्यांना वाचविण्यासाठी कांबळे यांचा मुलगा राहुल कांबळे (२८) मध्ये पडला. मात्र त्यालाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शंकर कांबळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी सोनाली बाईत आणि महेश पांडे या दोघांविरोधात हत्या केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३, ११५ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी आरोपी महेश पांडे आणि सोनाली बाईत या दोघांना अटक केली. दरम्यान, महेश पांडेने ८ जून रोजी शंकर कांबळे यांना मारहाण केली, त्यावेळी आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी केवळ समज देऊन त्याला सोडून दिले, असे राहुल कांबळे याने सांगितले.

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने झालेल्या मारहाणीत शंकर कांबळे यांचा मृत्यू झाला. आम्ही हत्येचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त संपतराव पाटील यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.