मुंबई : माझगाव येथील ५३ वर्षीय महिला गुलशन खानचा मृत्यू हा आत्महत्या नसून खून असल्याचे स्पष्ट झाले आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालातून ही बाब उघड झाली आहे. याप्रकरणी तिच्या २७ वर्षीय पतीला आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात शोएबचा भाऊ जैद इम्तियाज हुसेन खान आणि त्यांची आई रोशन खान यांनाही सहआरोपी असून ते सध्या फरार आहेत.
माझगाव येथे राहणाऱ्या गुलशन खान (५२) या महिलेने तिचा पुतण्या शोएब इम्तियाज खान उर्फ बोबडा (२७) याच्याशी २०२२ मध्ये दुसरे लग्न केले होते. पतीचे घर सोडून जाताना गुलशनने घरातून ६५ तोळे सोने घेतले होते. लग्नानंतर गुलशनचा पती शोएब, दिर आणि सासू तिचा छळ करत होते. गुलशन ६ एप्रिल रोजी राहत्या घरातून खाली पडल्याने तिचा मृत्यू झाला होता. सुरवातील पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करून आत्महत्येची नोंद केली होती. मात्र तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीने गुलशनच्या हत्येची शंका वर्तवली होती.
पोलिसांना घरातील बाथरूमच्या दारावर आणि चप्पलवर रक्ताचे डाग आढळले होते. पोलिसांनी हे पुरावे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. त्याचा अहवाल आल्यानंतर गुलशनची हत्या झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी मयत गुलशनचा पती शोएब याला अटक केली आहे. या प्रकरणात झैद आणि रोशन खान यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.