मुंबई : अंधेरीतील प्रसिद्ध सात बंगला परिसरातील १२४ वर्ष जुना ‘रतन कुंज’ बंगला जमीनदोस्त होणार आहे. १२४ वर्षांपूर्वी सात श्रीमंत कुटुंबांनी बांधलेल्या बंगल्यांमुळे हा परिसर ‘सात बंगला’ नावाने ओळखला जातो. या सात बंगल्यांपैकी आता केवळ दोनच बंगले शिल्लक आहेत. त्यातही समुद्रकिनाऱ्यावर वसलेला ‘रतन कुंज’ हा बंगला धोकादायक स्थितीत आहे, यावर महापालिकेच्या तांत्रिक सल्लागार समितीकडून शिक्कामोर्तब झाल्यानंतर मंगळवारपासून या बंगल्याचे पाडकाम सुरू करण्यात आले असल्याची माहिती के पश्चिम विभागाच्या पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

महापालिकेने हा १२४ वर्ष जुना बंगला धोकादायक स्थितीत असून तो लवकरात लवकर खाली करण्याची नोटीस मालक बरार कुटुंबीयांना दिली होती. मात्र या बंगल्याची मालकी दोन भावांकडे असून त्यांच्यापैकी एका कुटुंबाने बंगला त्वरीत खाली करण्याची तयारी दाखवली होती. तर शालू बरार आणि त्यांच्या दोन मुलांकडे या बंगल्याचे अर्धे मालकी हक्क असल्याने त्यांनी मात्र बंगला सोडण्यास नकार दिला होता. ही जागा लाटण्याचा डाव असल्याचा संशय शालू बरार यांनी व्यक्त केला होता. त्यांनी पालिकेच्या नोटीशी विरोधात न्यायालयात धाव घेतली होती.

हेही वाचा – दादरमधील महिलेने अटल सेतूवरून उडी मारली

हेही वाचा – मी १०० टक्के निवडणुकीच्या रिंगणात, ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत – वसंत मोरे

हेही वाचा – सासू-सासऱ्यांसाठी विवाहितेला बेघर करणे अयोग्य, उच्च न्यायालयाचा निर्वाळा; ज्येष्ठ नागरिक कायद्याचा गैरवापर टाळा!

या बंगल्यावरून दोन भावांमध्ये वाद आहेत. दोन्ही कुटुंबांनी बंगल्याचे वेगवेगळे संरचनात्मक लेखापरीक्षण करून त्याचे स्वतंत्र अहवाल पालिकेकडे दिले होते. हे दोन्ही अहवाल तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठवण्यात आले होते, त्यावर समितीने संबंधित बंगला राहण्यायोग्य स्थितीत नसल्याचा निर्णय दिला. संबंधित कुटुंबियांनी बंगला खाली करत असल्याचे निवेदन न्यायालयात दिले आहे. त्यामुळे नियमानुसार बंगला जमीनदोस्त करण्याच्या कारवाईला मंगळवारपासून सुरुवात करण्यात आली असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.