मुंबई : मुंबईत मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये यंदाच्या पावसाळ्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत प्रचंड वाढ झाली आहे. मलेरियाच्या रुग्णांमध्ये ४५ टक्के वाढ तर डेंग्यूच्या रुग्णांमध्ये २० टक्के वाढ झाली आहे. डासांपासून होणाऱ्या या आजारांमध्ये वाढ झाल्यामुळे मुंबई महापालिकेच्या औषध फवारणी आणि अन्य उपाययोजनांबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. खारमध्ये एकाच कुटुंबातील चौघांना डेंग्यू झाला असून एका महिलेला डेंग्यू आणि मलेरिया हे दोन्ही एकत्र झाले आहेत.

दरवर्षी पावसाळा आला की त्यापाठोपाठ पावसाळी आजारही डोके वर काढतात. यंदाही पावसाळी आजारांनी मुंबईत थैमान घातले असून डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. डासांची उत्पत्तीस्थाने शोधून काढून नष्ट करण्यासाठी पालिकेने अनेक उपाययोजना केल्याचा दावा केलेला असला तरी मुंबई महापालिकेनेच जाहीर केलेल्या आकडेवारीत रुग्णांची संख्या वाढलेली दिसते आहे.

खार पश्चिम येथील आंबडकर नगरच्या जवळच राहणाऱ्या एका कुटुंबातील चार जणांना मे महिन्यातच डेंग्यू झाला होता. त्याच कुटुंबातील महिलेला आता पुन्हा एकदा डेंग्यू झाला असून त्यातच त्यांना मलेरियाही झाल्याचे आढळून आले आहे. याबाबत त्यांनी सांगितले की, मे महिन्यात मला, माझ्या मुलाला, जावेला आणि नणंदेला डेंग्यू झाला होता. तर आता काही दिवसांपूर्वी मला पुन्हा एकदा डेंग्यू झाला असून अद्यापही मी रुग्णालयात दाखल आहे. डेंग्यूच्या उपचारांसाठी मी आतापर्यंत हजारो रुपये खर्च केले आहेत. पूर्वी मुंबई महापालिकेची यंत्रणा औषध फवारणीसाठी येत असे. मात्र यंदा आमच्या विभागात कोणीही औषध किंवा धूर फवारणीसाठी आलेले नाही. आम्ही जेथे राहतो तिथे एका बाजूला उच्चभ्रू लोकांची वस्ती आणि दुसरीकडे झोपडपट्टी आहे. झोपडपट्टीतही कधी औषध फवारणी केली जात नाही.

पालिका शांतच?

उच्चभ्रू वस्तीत कधीतरी औषध फवारणी होताना दिसली तेव्हा चौकशी केली असता ती सोसायटी खाजगी पध्दतीने करून घेते असे समजले. मी जेथे वैद्यकीय चाचण्या केल्या तेथे रोज किमान पाच रुग्ण डेंग्यू किंवा मलेरियाचे आढळतात. इतके प्रमाण वाढलेले असताना पालिकेची यंत्रणा उपाययोजना का करीत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

पाऊस लवकर आला म्हणून ….

दरम्यान, यावर्षी पावसाला लवकर सुरुवात झाली. मे महिन्यापासूनच पाऊस पडू लागल्यामुळे डासांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, हिपॅटायटिसच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

मच्छरदाणी वापरा …..

अनाफिलीस व एडीस डासांच्या प्रजातींचे उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यासाठी झिरो डास उत्पत्ती मोहीम सुरू करण्यात आली असल्याचे किटक नाशक विभागाचे म्हणणे आहे. डासांपासून संरक्षणासाठी मच्छरदाणीचा वापर करण्यासाठी जनजागृती केली जात असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

१४ लाख घरांचे सर्वेक्षण….

दरम्यान, डेंग्यू व मलेरियाचे रुग्ण शोधून काढण्यासाठी गेल्या महिन्यात घराघरात सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात तब्बल १४ लाखांहून अधिक घरांचे सर्वेक्षण केल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. यामध्ये ६९ लाखांहून अधिक लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. तर २ लाख ३१ हजार लोकांचे रक्तांचे नमुने घेतले आहेत, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

याबाबत पालिकेच्या एच पश्चिम विभाग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की डासांची उत्पत्ती स्थळे शोधण्यासाठी सतत मोहीम सुरू असते. मात्र त्यातून एखादा परिसर राहिला असेल तर त्याची आम्ही तपासणी करू असेही अधिकारी म्हणाले.

रुग्णांची दोन वर्षांतील आकडेवारी (जानेवारी ते जुलै)

आजार२०२४२०२५
मलेरिया२८५२४१५१
डेंग्यू९६६११६०
चिकुनगुनिया४६२६५