मुंबई : राज्यातील सर्व क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा राबविण्याबाबतच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. त्यावर आगामी १०० दिवसांमध्ये कार्यालयाचे संकेतस्थळ, सुकर जीवनमान, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निराकरण, कार्यालयातील सोयी – सुविधा, गुंतवणूक प्रसार व क्षेत्रीय कार्यालयांना भेटी याबाबतचा सात कलमी कृती आराखडा राबविण्यात आला होता. यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या महाराष्ट्रातील विभागीय स्तरावरील शासकीय कार्यालयामध्ये विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई कार्यालयाचा प्रथम क्रमांक आला आहे.

१०० दिवसाचा कृती आराखडा राबविण्यामध्ये शिक्षण विभागातील विभागीय स्तरावरील आठ उपसंचालक कार्यालये सहभागी होती. या १०० दिवसाचा कृती आराखडा राबविण्याबाबतचा दुसऱ्या टप्याचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय हे लोकाभिमुख कार्यालय आहे. या कार्यालयामध्ये विद्यार्थी, शाळा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांमध्ये शैक्षणिक क्षेत्रातील सूसत्रता व पारदर्शकता आणण्याचे व त्याबाबत येणाऱ्या अडचणी, तक्रारींचे निराकरण करण्याचे काम केले जाते. या कार्यालयात अभ्यागतांसाठी बसण्याची व्यवस्था, दिव्यांग व्यक्तींना सुलभतेने कार्यालयात ये-जा करण्याची सोय, दिशादर्शक फलक, कर्मचारी, अधिकारी व अभ्यागंतासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पुरूष व महिलांसाठी स्वतंत्र, स्वच्छ स्वच्छतागृह, तसेच प्रसन्न व अल्हाददायक अशी वातावरण निर्मिती या कार्यालयात करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई कार्यालयामध्ये ऑनलाईन व ऑफलाईनद्वारे उपलब्ध होणाऱ्या जनतेच्या सर्व तक्रारींचे निराकरण विहीत कालावधीत पूर्ण करण्यात येते. तसेच या कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना शासकीय कामकाजाचा पाठपुरावा करण्यासाठी क्षेत्रीय भेटीचे आयोजन करण्यात येते. या सर्व कार्यामध्ये विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रयत्नाने व या कार्यालयास भेट देणाऱ्या विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक तसेच शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांचा यामध्ये सहभाग असल्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी सांगितले.