मुंबई : पावसाळ्यात सर्दी, ताप, खोकला हे आजार सर्रास पाहायला मिळतातच, मात्र यंदा एक वेगळा आणि डोळ्यांना त्रासदायक संसर्ग डोके वर काढतोय. तो म्हणजे डोळ्यांतील विषाणूजन्य संसर्ग.डॉक्टर आणि नेत्ररोगतज्ज्ञांच्या मते अँडिनोव्हायरस आणि एन्टेरोव्हायरस या दोन प्रमुख विषाणूंमुळे डोळ्यांतील संसर्ग झपाट्याने पसरत आहे. विशेषतः व्हायरल कंजंक्टिव्हायटिस या स्वरूपात रुग्ण समोर येत आहेत.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार जून २०२५ पासून आजपर्यंत मुंबई, पुणे, नाशिक व नागपूरसारख्या शहरांत ३०,००० पेक्षा अधिक कंजंक्टिव्हायटिसची प्रकरण नोंदवली गेली आहेत.या रुग्णांपैकी ८० टक्के प्रकरणं अँडिनोव्हायरसशी संबंधित असल्याचं नेत्रतज्ज्ञांचे म्हणणं आहे, तर उर्वरित प्रकरणांमध्ये एन्टेरोव्हायरसची लक्षणं आढळली आहेत.

‘एन्टेरो आणि अँडिनो’ व्हायरसचा प्रसार थेट हातांवरून होतो. म्हणजेच, संक्रमित व्यक्तीशी ‘हँडशेक’ केल्यास किंवा अशा व्यक्तीचा रुमाल, टॉवेल, मोबाईल, दाराची कडी किंवा इतर वस्तूंना हात लावल्यानंतर डोळ्यांना हात लावल्यास विषाणू सहज डोळ्यांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे संसर्ग झपाट्याने पसरतो. ही साखळी तोडण्यासाठी हात स्वच्छ ठेवणे, रुमाल शेअर न करणे आणि डोळ्यांना वारंवार स्पर्श न करणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे.

हात स्वच्छ न धुता डोळ्यांना हात लावणे, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता, एकाच घरात एकाच टॉवेलचा वापर, डोळ्यांना सतत चोळणे ही या संसर्गाची प्रमुख कारणं आहेत. पावसात वातावरणात आर्द्रता वाढल्यामुळे डोळ्यांच्या रेटीनावर विषाणूचा आघात अधिक सहज होतो. त्यामुळे विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आधीपासून आजारी असलेल्यांना याचा धोका अधिक असतो.

पावसाळ्यात हस्तांदोलन टाळा

डोळ्यांत खाज, लाल होत असल्यास ती दुर्लक्षित न करता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे. चुकीच्या घरगुती उपायांनी डोळ्यांची स्थिती अधिक बिघडू शकते. काहीजण इंटरनेटवर वाचून डोळ्यांत हळद, बर्फ, पाण्याचे फवारे वापरत असल्याचे आढळून आले आहे. पण हे उपाय आरोग्यास घातक ठरू शकतात. कोणतेही ड्रॉप्स, थेंब किंवा अँटीबायोटिक्स नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय वापरू नयेत असे ज्येष्ठ नेत्रशल्यचिकित्सक डॉ तात्याराव लहाने यांनी सांंगितले.

डोळे येण्याचं प्रमाण सध्या झपाट्याने वाढत आहे आणि एकाच घरात अनेक सदस्यांना याचा त्रास होतो आहे. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छतेची जबाबदारी घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर, हात धुण्याची सवय आणि स्वतःच्या वस्तू इतरांशी शेअर न करणे ही खबरदारी आवश्यक आहे. हस्तांदोलनासारखी साधी कृतीही अँडिनो आणि एन्टेरो व्हायरस विषाणूचा मार्ग बनत असल्यामुळे लोकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. पावसाळ्यात डोळ्यांपासून सुरुवात होणाऱ्या या संसर्गाच्या साखळीला तोडण्यासाठी स्वच्छता, सजगता आणि त्वरित उपचार हाच एकमेव उपाय आहे. वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच उपचार करावेत असे ठाणे जिल्हा रुग्णालयातील नेत्र शल्यचिकित्सक डॉ. प्रसन्नकुमार देशमुख यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वतः उपचार करणे टाळा

डोळ्यांत सतत पाणी येणे ,डोळे लाल होणे किंवा सुजणे ,प्रकाश सहन न होणे काही वेळा डोळ्यातून रक्तासारखा स्त्राव आदी याची लक्षणे असून या व्हायरल डोळ्यांच्या संसर्गाचा फैलाव प्रचंड वेगाने होतो. शक्यतो हस्तांदोलन टाळा, हात वारंवार धुवा ,स्वतःचे रूमाल, उशा, टॉवेल इतरांसोबत शेअर करू नका ,डोळ्यांना हात लावणे टाळा मास्क वापरा, गर्दीपासून दूर राहा डोळे दुखत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या ,”ही साथ अत्यंत संसर्गजन्य आहे. ऑफिस, शाळा, घर याठिकाणी स्पर्श टाळणं आणि स्वच्छता राखणं अत्यावश्यक आहे.त्यामुळे हलगर्जीपणा न करता त्वरित नेत्ररोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, अस आवाहन डॉक्टरांनी केले आहे.