मुंबई ड्रग्स प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याच्यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप केला आहे. हिंदू-मुस्लिम वादासाठी शाहरुखच्या मुलाला अटक करण्यात आल्याचं ते म्हणाले आहेत. देशात हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचा कट शिजत असल्याचा गंभीर आरोपही नाना पटोले यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याविषयी पत्रकार परिषदेत बोलत असताना पटोले म्हणाले, “एनसीबी ज्या पद्धतीने हे प्रकरण दाबायचा प्रयत्न करत आहे त्यावरुन निश्चितच दाल मे कुछ काला है. हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करुन एका मोठ्या नायकाच्या मुलाच्या विरोधात षडयंत्र करुन हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करायचा भाजपाचा प्रयत्न आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, जे चूक करतील त्यावर कारवाई झाली पाहिजे. पण अदानी मुंद्रा बंदरावर ३००० हजार किलो अमली पदार्थ सापडले त्याचे काय झाले? त्याच्यावर काहीच कारवाई केली जात नाही. आपल्या उद्योगपती मित्रांना वाचवण्यासाठी व अदानी मुंद्रा बंदरावर सापडलेल्या अमली पदार्थाच्या मोठ्या साठ्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मुंबईत कारवाया केल्याचे दाखवले जात आहे”.

हेही वाचा – मोठी घडामोड! शाहरुख खानने आर्थर रोड तुरुंगात जाऊन घेतली आर्यनची भेट

क्रुझवरील अमलीपदार्थांच्या पार्टीप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन हा नियमितपणे अमलीपदार्थाबाबतच्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होता आणि त्याचा अमलीपदार्थ विक्रेते आणि पुरवठादारांशी संबंध होता, असे निरीक्षण नोंदवून विशेष सत्र न्यायालयाने बुधवारी त्याला जामीन देण्यास नकार दिला. अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचाही  जामीन अर्ज फेटाळला.

न्यायालयाने आर्यनच्या व्हॉट्सअ‍ॅप संदेशांचा दाखला दिला. आर्यन आणि अन्य दोन आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग सकृतदर्शनी गंभीर आहे. त्यामुळे जामिनावर असताना तो अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा करणार नाही हे म्हणता येऊ शकत नाही, शिवाय एनसीबीने प्रकरणाशी संबंधित सादर केलेली कागदपत्रे आणि आर्यन, अरबाज यांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर स्वेच्छेने दिलेल्या जबाबानुसार त्यांनी सेवनासाठी अमलीपदार्थ बाळगल्याचे कबूल केले होते. यावरून अरबाजच्या बुटातून हस्तगत केलेल्या अमलीपदार्थाबाबत त्याला माहिती होती हेच स्पष्ट होते. या बाबी लक्षात घेता आरोपींना जामीन देता येणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai drugs case congress state president nana patole alleges arrest of aryan khan for hindu muslim polarization vsk
First published on: 21-10-2021 at 19:41 IST