मुंबईत रेव्ह पार्टीवर करण्यात आलेल्या कारवाईत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आल्यानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत. अमली पदार्थ प्रकरणात आर्यन खान व अरबाज मर्चंट याच्या अटकेच्या वेळी के.पी. गोसावी व भाजपाचे पदाधिकारी मनीष भानुशाली हे दोघे उपस्थित होते व त्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. भाजपाच्या पदाधिकाऱ्याच्या राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी पथकाशी (एनसीबी) संबंध काय आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला आहे.
नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपा नेत्यांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाउनमध्ये ठाकरे सरकारने सर्वप्रथम दारुची दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला होता. चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्याचा निर्णयही याच सरकारचा. नशा माफियांसमोर लोटांगण घालण्याची हीच परंपरा जारी ठेवत आणि एक पाऊल पुढे टाकत मंत्री नबाव मलिक यांनी एनसीबीवर आरोप करून ड्रग्जवाल्यांची तळी उचलेली आहे अशी टीका भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. तर आमदार राम कदम यांनीही नवाब मलिक यांना ड्रगमाफियांकडूनही वसुली करता का?” राम असा सवाल केला होता. त्यानंतर आता आमदार आशिष शेलार यांनी नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
आशिष शेलार यांनी ट्विट करत नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. “अन्याय झालेल्या करुणा शर्मा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला निघाल्या तर त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करुन फसवले. भाजपा नेते किरीट सोमय्या भ्रष्टाचाराची तक्रार करायला निघाले तर त्यांना खोट्या नोटीस बजावल्या आणि पोलिसांकडून रोखले,” असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
“स्वतःचा जीव धोक्यात घालून ड्रग्जबाबत माहिती देत पोलीसांना कायदेशीर मदत, धाडसी पंच म्हणून काम करणाऱ्या भाजपा कार्यकर्ते मनिष भानुशालीच्या नावाने थयथयाट. ज्यांच्याकडे गृह विभाग त्या राष्ट्रवादीचे हे पहा असे हे “नवाब”! “चोर मचाये शोर!!”, असे आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करताना ज्या व्यक्तींची छायाचित्रे समाजमाध्यमावर प्रसिद्ध झाली आहेत, त्यातील के.पी.गोसावी नावाची व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नसल्याचे खुद्द एनसीबीने स्पष्ट केले आहे. तसेच अरबाजला अटक करणारा मनीष भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष असून तोही एनसीबीचा अधिकारी नसल्याचे समोर आले आहे. मग या दोघांनी कोणत्या अधिकारात आर्यन व अरबाजला अटक केली, याचा खुलासा एनसीबीने केला पाहिजे, अशी मागणी मलिक यांनी केली. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना केंद्रीय यंत्रणांनी अटकेचे अधिकार दिले आहेत का, असा सवाल नवाब मलिक यांनी केला.
दरम्यान,एनसीबीने केलेल्या कारवाईशी भाजपचा कोणताही संबंध नसून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला तुरुंगवास घडल्याने आलेल्या वैफल्यातून त्यांनी हे आरोप केले असल्याचे प्रत्युत्तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिले.