२ ऑक्टोबरला एनसीबीनं मुंबईत कॉर्टेलिया क्रूझवर छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईदरम्यान, एनसीबीनं एकूण ८ लोकांना अटक केली आहे. अटकेची कारवाई झाल्यापासून हे सर्वजण तुरुंगातच असून त्यांच्या जामीन याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मुंबईतील विशेष न्यायालयामध्ये यासंदर्भात सुनावणी सुरू असताना आज अखेर दोन आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये पहिल्यांदाच आरोपींना जामीन मिळाला आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्ज विशेष एनडीपीएस न्यायालयाने फेटाळून लावले होते. त्यानंतर या तिघांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. त्यांच्या अर्जांवर सुनावणी सुरू असताना दुसरीकडे एनडीपीएस न्यायालयात देखील या प्रकरणातील इतर आरोपींच्या जामीन अर्जांवर सुनावणी सुरू आहे. याच सुनावणीमध्ये दोन आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, मनीश राजगरिया आणि आविन साहू या दोघा आरोपींना विशेष एनडीपीएस न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात जामीन मिळालेले ते पहिलेच आरोपी आहेत.

यातील एक सहआरोपी मनिष राजगरियाचे वकील अजय दुबे यांनी पत्रकारांना याची माहिती दिली आहे. मुंबई शहरातील विशेष एनडीपीएस न्यायायाने मनीष राजगरियाला जामीन मंजूर केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Aryan Khan Case: आर्यन खानला आजही जामीन नाही, उद्या दुपारी पुन्हा होणार सुनावणी

दरम्यान, आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीन अर्जांवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीमध्ये आर्यन खानच्या जामीन अर्जावरची सुनावणी पूर्ण झाली असून आता अरबाज मर्चंटच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. आजचं कोर्टाचं कामकाज पूर्ण झाल्यानंतर आता उद्या दुपारी ही सुनावणी पुन्हा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे आजची रात्र देखील आर्यन खानला तुरुंगातच काढावी लागणार आहे.