मुंबई : ‘उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेले सगळे आमदार हे विचित्र प्राणी आहेत. एक जण मुलींवर अत्याचार करणारा, एकाकडे पैशांची बॅग सापडते, एक आमदार मारामारी करतो…हे सगळे एकापेक्षा एक आहेत. यांना आवरणे हे शिंदे साहेबांसाठीही कठीण आहे. बरे झाले आमच्याकडची घाण तिकडे गेली,’ असे वक्तव्य मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.
बुलढाणा येथील शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या मतदारसंघात एक कार्यक्रम घेतला होता. त्यावेळी त्यांनी जो फलक लावला होता, त्यात फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या मुलाचा फोटो लावला होता. त्यावर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र लावले नव्हते. तसेच आनंद दिघे किंवा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही छायाचित्र लावलेले नसल्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना या संदर्भात प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता, आमदार संजय गायकवाड यांनी दाखवून दिले, एकनाथ शिंदे आमचे कोणी नाही, आनंद दिघे आमचे कोणी नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र लावण्याची तर यांची लायकीच नाही, असेही किशोरी पेडणेकर यांनी म्हटले. शिंदे ज्यांना घेऊन बाहेर पडले तेच त्यांना आता भारी पडणार आहेत, एवढे मात्र नक्की असेही पेडणेकर यांनी नमूद केले.