मुंबई: भारतीय चलनातील नोटांच्या बदल्यात बनावट नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या एका टोळीला गुन्हे शाखेने सोमवारी विक्रोळी परिसरातून अटक केली. पोलिसांनी या आरोपींच्या ताब्यातून सहा मोबाइल आणि मोठ्या प्रमाणात बनावट नोटा हस्तगत केल्या.
मुंबई शहरात एक मोठी टोळी बनावट नोटांची विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष ६ च्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेने तपास करीत या टोळीशी बनावट ग्राहक बनून संपर्क साधला. त्यावेळी २५ हजारात एक लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्यात येत असल्याची माहिती आरोपींनी दिली. पोलिसांनी तत्काळ या टोळीला विक्रोळी परिसरात बोलावले. त्यानुसार गुन्हे शाखा परिमंडळ ६ च्या अधिकाऱ्यांनी सोमवारी रात्री ११ च्या सुमारास विक्रोळी बस डेपो परिसरातील फिरोजशहा नगर येथे सापळा रचला. मिळालेल्या वर्णनाचे चार इसम या ठिकाणी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ झडप घालून या चौघांना ताब्यात घेतले.
नफिस खान, मंजर सोंडे, सईद सिद्धीकी आणि मोसीन चौधरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे आरोपी जास्त नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवून अनेकांना भारतीय नोटांच्या बदल्यात बनावट नोटा देत होते. पोलिसांनी या आरोपींच्या ताब्यातून एक मोटारगाडी , सहा मोबाइल आणि मोठ्या प्रमाणात बनावट नोटा हस्तगत केल्या. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.