मुंबई : क्रॉफर्ड मार्केट येथील मासळी व्यावसायिकांचे आंदोलन दोन आठवड्यांसाठी स्थगित करण्यात आले आहे. मासळी व्यावसायिक संघटनांचे प्रतिनिधी आणि मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यातील बैठक निष्फळ ठरल्यानंतर मंत्री नितेश राणे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत सकारात्मक आश्वासन मिळाल्यामुळे संघटनेने पुढच्या आठवड्यातील मोर्चा स्थगित केला. मात्र दोन आठवड्यांत तोडगा काढण्यात आला नाही, तर रस्त्यावर उतरण्याचा, इशारा संघटनांनी दिला आहे.

कॉफर्ड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडईची इमारत अतिधोकादायक घोषित झाल्यामुळे मुंबई महापालिकेने ही मंडई २०२१ मध्ये पाडून टाकली. मंडईतील मासळी व्यावसायिकांचे पुनर्वसन जवळच असलेल्या ज्योतिबा फुले मंडईत करण्यात येणार आहे. फुले मंडईच्या पुनर्विकासाचे काम सध्या सुरू आहे. त्यातच आता मुंबई महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराज मंडईच्या जागेची लिलावाद्वारे विक्री केली आहे. त्यामुळे मासळी व्यावसायिकांनी मूळ मंडईच्या विक्रीस विरोध केला आहे. फुले मंडईतील जागा मासळी विक्रेत्यांसाठी अपुरी असल्याचे मासळी विक्रेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शिवाजी महाराज मंडईची जागा मच्छीमार संघटनेला विकत द्यावी, असाही प्रस्ताव पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. मात्र लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यातच आता या लिलाव प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप मच्छीमार संघटनेने केला आहे. त्यामुळे मासळी विक्रेते आणि पालिका प्रशासन यांच्यात संघर्ष पेटला आहे.

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी मच्छीमार संघटनांची एक बैठक पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या दालनात पार पडली. यावेळी मच्छीमार संघटनांचे समाधान न झाल्यामुळे शुक्रवारी मत्स्योद्योग व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीत क्रॉफर्ड मार्केट येथील मासळी व्यावसायिकांचे हक्क अबाधित ठेवण्यात येतील, असे आश्वासन राणे यांनी दिले. सकारात्मक आश्वासन मिळाल्याने मच्छीमारांनी पुकारलेला जन आक्रोश मोर्चा तूर्तास स्थगित करून १५ दिवसांत संवादातून समाधानकारक निर्णय न घेतल्यास मच्छीमार मुंबईच्या रस्त्यावर उतरुन आपला आक्रोश व्यक्त करतील, अशी माहिती अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी दिली. यावेळी माथाडी कामगार नेते बळवंतराव पवार उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छत्रपती शिवाजी महाराज मासळी मंडईच्या भूखंडाच्या लिलावात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप मच्छीमार समितीने केला असून या प्रकरणी चौकशीची मागणी समितीने केली आहे. दरम्यान, पालिका प्रशासनाने आरोप फेटाळले असून फुले मंडईच्या पुनर्विकसित नवीन इमारतीमध्ये मासळी विक्रेत्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात येणार आहे. या इमारतीत वीज, पाणी, प्रसाधनगृह यांसारख्या आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. अग्निशमन सुरक्षा मंजुरी प्राप्त झाली असून इमारत भोगवटा प्रमाणपत्र देखील लवकरच प्राप्त होईल. त्यामुळे या इमारतीमध्ये जागा वाटपाची प्रक्रिया ऑगस्ट २०२५ मध्ये सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तसेच भूखंड लिलावाची निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यामध्ये आता बदल करता येणार नाही, असेही प्रशासनाने म्हटले आहे.