मुंबई : मुंबईत साजरा होणारा गणेशोत्सव जगप्रसिद्ध आहे. यंदा गणेश मंडळांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तसेच गणेश मंडळ आणि भक्तांची गैरसोय होऊ नये, याची दक्षता घेण्यात येईल, अशी ग्वाही कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

महानगरपालिकेच्या डी विभाग कार्यालयात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच गणेश मंडळांसोबत बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाला असून या वर्षापासून अनोख्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात येणार आहे. मुंबई महापालिका, बेस्ट प्रशासन आणि पोलीस विभागाच्या सहकार्याने दक्षिण मुंबईत ताडदेव, गिरगाव, वाळकेश्वर, खेतवाडी आणि लमिग्टन रोड परिसरात वैविध्यपूर्ण सजावट करण्याचे नियोजन असल्याचे लोढा यांनी सांगितले. यासंदर्भात स्थानिक पातळीवर समितीही स्थापन करण्यात येत आहे. न्यायालयाचे आदेश आणि कायदा सुव्यवस्थेचे पालन करून हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बैठकीत उपस्थित असलेल्या गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी लोढा यांनी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्या समस्यांचे निवारण करण्याचे आदेश त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. गणेशमूर्तींचे आगमन आणि विसर्जनादरम्यान होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्यावरील बेवारस वाहने त्वरित हटवून रस्ते मोकळे करण्याच्या सूचनाही त्यांनी वाहतूक पोलिसांना केल्या. यंदा एक खिडकी प्रणालीच्या माध्यमातून मंडळांना विविध प्रकारच्या ऑनलाइन परवानग्या देण्यास विलंब होऊ नये, याची दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीला महापालिकेचे उपायुक्त मनिष वळंजू, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे सचिव गिरीश वालावलकर, तसेच विविध गणेश उत्सव मंडळांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.