मुंबई : घाटकोपरमधील माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यातील ४०५३ घरांच्या बांधकामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) शनिवारी निविदा जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात २२ मजली सहा पुनर्वसित इमारतींचे बांधकाम करण्यात येणार असून या इमारतींमध्ये ३०० चौरस फुटांच्या ४०५३ घरांचा समावेश असणार आहेत. ही निविदा प्रक्रिया पूर्ण करून शक्य तितक्या लवकर प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन असणार आहे. दरम्यान, या बांधकामासाठी अंदाजे १४५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

पूर्वमूक्त मार्गाच्या घाटकोपर – ठाणे विस्तारीकरणासाठी थेट बाधित होणाऱ्या १६९४ घरांसह रमाबाई नगर आणि कामराज नगरमधील अंदाजे १४ हजार झोपड्यांचा पुनर्विकास एमएमआरडीए आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून संयुक्त भागीदारी तत्त्वावर करण्यात येत आहे. त्यानुसार झोपु प्राधिकरणाने चार हजारांहून अधिक झोपडीधारकांची पात्रता निश्चिती करून पात्र झोपडीधारकांना दोन वर्षांचे घरभाडे देऊन घरे रिकामी करून घेतली आहेत.

अंदाजे १७ एकर जागा रिकामी करण्यात आली असून झोपु प्राधिकरण लवकरच ही जागा एमएमआरडीएला वर्ग करणार आहे. जागा ताब्यात येणार असल्याने आणि पुनर्वसित इमारतींचा आराखडा पूर्ण झाल्याने आता पहिल्या टप्प्यातील १७ एकर जागेवर पुनर्वसित इमारतींचे बांधकाम करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यानुसार सहा पुनर्वसित इमारतींच्या बांधकामासाठी शनिवारी (२४ मे) निविदा प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती महानगर आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिल्या टप्प्यात सहा पुनर्वसित इमारती बांधण्यात येणार असून प्रत्येक इमारत दोन विंग्जची असणार आहे. तर प्रत्येक माळ्यावर ३०० चौरस फुटांची एकूण ३२ घरे असणार आहेत. सहा पुनर्वसित इमारती २२ मजली असणार आहेत. पहिल्या टप्प्यात ४०५३ घरे बांधण्यात येणार असून बांधकामाचा दर्जा आणि इमारतीतील सोयी-सुविधांवर विशेष भर दिला जाणार असल्याचे मुखर्जी यांनी यावेळी सांगितले. शक्य तितक्या लवकर निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष पुनर्वसित इमारतींच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या ४०५२ घरांच्या बांधकामासाठी सुमारे १४५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.