मुंबई- घाटकोपर मधील एका नामांकित क्रिकेट प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षकाने १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी देवनार पोलिसांनी आरोपी प्रशिक्षकावर बलात्कार आणि पोक्सोच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करून अटक केली आहे. विशेष म्हणजे या प्रशिक्षकावर यापूर्वी देखील विनयभंगाचा गुन्हा दाखल होता.

पीडित मुलगी १३ वर्षांची असून घाटकोपर येथे राहते. क्रिकेट मध्ये तिला विशेष आवड होती. क्रिकेटचे चांगले प्रशिक्षण मिळावे यासाठी तिच्या पालकांनी तिला घाटकोपर मधील एका नामांकित क्रिकेट प्रशिक्षण अकादमीमध्ये पाठवले होेते. या केंद्रात क्रिकेट शिकविण्यासाठी असलेला ३८ वर्षीय प्रशिक्षक वारंवार या पीडित मुलीचा लैंगिक छळ करत होता. नंतर तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करू लागला. २८ मे ते ४ ऑगस्ट या कालावधीत हा प्रकार सुरू होता. याबाबत कुणाला वाच्यता केल्यास गंभीर परिणाम होतील अशी धमकी देत होता. मैदानावर अन्य मुले नसताना तो पीडित मुलीला प्रशिक्षण केंद्राच्या खोलीत बोलावून हे कृत्य करत होता. अखेर हा प्रकार असह्य झाल्यानंतर मुलीने हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. तिच्या पालकांनी देवनार पोलीस ठाण्यात धाव घेऊन प्रशिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

आरोपी प्रशिक्षकाविरोधात यापूर्वीही गुन्हे

देवनार पोलिसांनी आरोपी प्रशिक्षकाविरोधात भारतीय न्याहय संहितेच्या कलम ३५१ (२), (धमकावणे) बळजबरीने बलात्कार आणि वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी ६४ (२) (एफ), ६४ (२) (आय) ६४(२) (एम) ६५ (१)८ तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोक्सो) च्या कलम १२, ४, ६ आणि ८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रशिक्षकाला देवनार पोलीस आणि गुंडा विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याविरोधात यापूर्वी २०२३ मध्ये विनयभंग आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल आहे.

कराटे प्रशिक्षकाकडूनही लैंगिक अत्याचार

८ जुलै रोजी दादर मध्ये कराटेचे प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकाने १२ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले होते. आरोपी पीडित मुलीला धमकावून ७ महिन्यांपासून अत्याचार करत होता. हा प्रकार कोणाला सांगितल्यास पीडित मुलीच्या आईलाही त्रास देण्याची धमकी आरोपीने दिली होती. या सर्व प्रकारामुळे पीडित मुलगी घाबरली होती. कराटे क्लासला जाणे टाळत होती. अखेर पीडित मुलीच्या आईने तिच्या वगण्यातील बदल हेरून तिला विश्वासात घेऊन विचारणा केली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. शिवाजी पार्क पोलिसांनी २२ वर्षीय आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६४, ६५ (१), ३५१ (३) व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यातील कलम ४, ८, १२ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली होती.