मुंबई : गोरेगावमधील ओबेरॉय संकुलातील बहुमजली इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून उडी मारून १७ वर्षीय तरूणीने आत्महत्या केली. नैराश्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे याच ओबेरॉय संकुलातील आत्महत्येची ही चौथी घटना आहे.

एका नामांकीत महाविद्यालयात इयत्ता ११ वीमध्ये शिक्षण घेत असलेली १७ वर्षांची तरूणी गोरेगावमधील २३ मजली ओबेरॉय स्क्वेअर इमारतीत वास्तव्यास होती. या मुलीचे वडील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक आहेत. ती गुरुवारी दुपारी खोलीत अभ्यास करत बसली होती. त्यावेळी तिची आई आणि आजी-आजोबा घरात होते. वडील कामानिमित्ताने बाहेर गेले होते. दुपारी ३.३० च्या सुमारास अचानक या तरुणीने आपल्या खोलीच्या खिडकीतून खाली उडी मारली. उंचावरून खाली पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तिने आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहिलेली नव्हती. गेल्या काही वर्षांपासून ती नैराश्यग्रस्त होती. तिच्यावर अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते, अशी माहिती आरे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिली. याप्रकरणी आरे पोलीस ठाण्यात अपमृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.

ओबेरॉय संकुलातील चौथी आत्महत्या

गेल्या सहा महिन्यांमध्ये गोरेगावमधील ओबेरॉय संकुलातील विविध इमारतींमधून उडी मारून चौघांनी आत्महत्या केली आहे. जुलै महिन्यात अनंत द्विवेदी (२२) या तरुणाने या ओबेरॉय ईस्क्वेअर या इमारतीच्या ४५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. ओबेरॉय संकुलातील एका इमारतीच्या ४५ व्या मजल्यावरून उडी मारून १७ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीने २८ मे २०२५ रोजी आत्महत्या केली होती. आत्महत्येच्या वाढत्या घटनांमुळे चिंता व्यक्त होत आहे.

म्हणून उंच इमारतीवरून आत्महत्या केली जाते

उंच इमारतीवरून आत्महत्या करण्याच्या मानसिकतेबाबत वेगवेगळी कारणे असल्याचे विश्लेषण मानसोपचारतज्ज्ञांनी केले आहे. आत्महत्या ही क्षणात केली जाणारी कृती असते. अनेकदा आत्महत्या करणारी व्यक्ती काही मिनिटांपूर्वी पर्याय शोधत असते. त्या क्षणी समोर दिसणारी गच्ची, टेरेस किंवा गॅलरी आदी सोपे मार्ग वाटतात, असे मानसोपचारतज्ञ डॉ. सुरेश पाटील यांनी सांगितले. उंच इमारती म्हणजे सहज उपलब्ध मार्ग वाटतो. एखाद्या व्यक्तीवर भावनिक, सामाजिक वा मानसिक ताण असतो, तेव्हा असा मार्ग सहज दृष्टीस पडतो, असे मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितले. कॉपी कॅट अर्थात अनुकरण करण्याची एक पध्दत आहे. एकाने केले म्हणून दुसरा त्याच पध्दतीची कृती करतो. उंच इमारतीवरून उडी मारून एकाने आत्महत्या केल्यानंतर त्याचे अनुकरण करण्यात येते, असाही एक निष्कर्ष मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.