मुंबई : सिंगापूरच्या धर्तीवर साकारण्यात येणाऱ्या भारतातील पहिल्या ‘गोराई कांदळवन उद्याना’चे लोकार्पण मे महिन्यात करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, उद्यानातील काही कामे शिल्लक असून ही कामे पूर्ण व्हायला काही अवधी लागणार आहे. त्यामुळे गोराईतील कांदळवन सफरीसाफी नागरिकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

गोराई येथे आठ हेक्टर क्षेत्रावर तर दहिसर येथे ३० हेक्टर क्षेत्रावर कांदळवन उद्यान विकसित करण्यात येत आहे. हे उद्यान गोराई जेट्टीजवळ असून या उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या कांदळवन उद्यानात पर्यटकांना सुमारे ७०० मीटर लांबीच्या मार्गावरून सफर घडणार आहे. दरम्यान, उद्यानाचे काम पूर्ण झाले आहे. काही छोटी-मोठी कामे शिल्लक आहेत. या उद्यानाची नेमकी किती कामे शिल्लक आहेत हे १५ मेपर्यंत स्पष्ट होईल. त्यानुसार उद्यानाच्या लोकार्पणाबाबत निर्णय घेण्यात येईल. साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात या उद्याने लोकार्पण करण्याचा प्रयत्न असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.

७०० मीटर लांबीचा उन्नत मार्ग

सिंगापूर, अबूदाबी, थायलंडच्या धर्तीवर गोराईमध्ये उन्नत मार्ग साकारण्यात आला आहे. हा मार्ग लाकडी असून त्याची लांबी ७०० मीटर आणि रुंदी २.४ मीटर आहे. तसेच या मार्गात जागोजागी विश्रांतीस्थळ आणि माहितीस्थळ आहेत. हा उन्नत मार्ग तयार करताना कोणत्याही वनस्पतीला हानी पोहोचणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे, अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली. गोराई कांदळवन उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात असून काही छोटी-मोठी कामे शिल्लक आहेत.

बोर्डवॉकवरून कांदळवन न्याहाळता येणार

लाकडाचा वापर करून बोर्डवॉक तयार करण्यात आला आहे. या बोर्डवॉकवरून पर्यटकांना कांदळवन न्याहाळता येणार आहे. पर्यटकांसाठी बोर्डवॉकवर विविध ठिकाणी आसन व्यवस्थाही करण्यात आली आहे. एकही झाड न तोडता, निसर्गाची हानी होणार नाही, अशा पद्धतीने कांदळवन उद्यानाची संरचना तयार करण्यात आली आहे. या उद्यानाला भेट देणाऱ्यांना मुंबईतील कांदळवन परिसंस्थेचे महत्त्व, कांदळवनामुळे मानवाला होणारे फायदे समजू शकतील. त्याचबरोबर कांदळवनाच्या संवर्धनाची आवश्यकता आणि संवर्धनासाठी उपाय कोणते ? याची माहितीही मिळू शकणार आहे.