मुंबई : पावसाळी अधिवेशन काळात मुंबईतील हजारो फेरीवाल्यांनी पुकारलेल्या आंदोलनानंतर आता दादर परिसरात फेरीवाल्यांनी पुन्हा व्यवसाय थाटायला सुरुवात केली. मात्र, महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या कारवाईमुळे फेरीवाल्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. कोल्हापुरातील हत्ती आणि मुंबईतील कबुतरांप्रती हे सरकार संवेदनशील आहे. मात्र, पात्र फेरीवाल्यांना व्यवसायासाठी अद्यापही संघर्ष करावा लागत असल्याबद्दल फेरीवाल्यांनी संताप व्यक्त केला आहे.
मुंबई महानगरपालिकेने दादर परिसरात फेरीवाल्यांविरोधात कारवाई तीव्र केल्याने जवळपास तीन महिन्यांपासून फेरीवाल्यांचे व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले होते. पावसाळी अधिवेशन काळात आझाद मैदानात मुंबईतील फेरीवाल्यांनी महापालिकेच्या कारवाईविरोधात आंदोलन करीत न्यायासाठी साकडे घातले होते. त्या आंदोलनाला शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फेरीवाल्यांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या. तसेच, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनीही अधिवेशनात फेरीवाल्यांच्या समस्येबाबत मुद्दे मांडले होते. शिवाय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फेरीवाला संघटनेची चर्चा झाली आहे.
पोलीस आयुक्त आणि महापालिका अधिकाऱ्यांसोबत या समस्येबाबत पुढील आठवड्यात चर्चा होणार आहे. दरम्यान, महापालिकेच्या कारवाईला न जुमानता दादरमध्ये फेरीवाल्यांनी पुन्हा व्यवसाय सुरू केले असून त्या ठिकाणी ग्राहकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. जवळपास तीन ते साडे तीन महिन्यांनंतर व्यवसाय सुरू झाल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महानगरपालिकेकडून दादर परिसरात अद्यापही कारवाई केली जाते. मात्र, त्याचेप्रमाण पूर्वीपेक्षा कमी आहे. असे असले तरीही पोलिसांकडून सातत्याने कार्यवाही सुरूच असल्याचे फेरीवाल्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, महानगरपालिकेने न्यायालयात फेरीवाल्यांच्या गर्दीने व्यापलेल्या २० ठिकाणांची यादी सादर केली होती. त्यानुसार पालिकेने फेरीवालामुक्त परिसर मोहिमेची अंमलबजावणी अधिक तीव्र केल्याने फेरीवाले संतप्त झाले आहेत. संबंधित ठिकाणावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांचे कुठे स्थलांतर करायचे, याबाबत अभ्यास करून, फेरीवाल्यांची बाजू ऐकून, त्यांना विश्वासात घेऊन ही योजना राबवली जाणार असल्याचे पालिकेने सांगितले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप फेरीवाल्यांकडून केला जात आहे.
भुलेश्वर, घाटकोपर (पूर्व, पश्चिम), दवाबाजार, बोरिवली, मुलुंड आदी ठिकाणच्या फेरीवाल्यांविरोधात महापालिकेने कारवाई तीव्र केली आहे. संविधानाने प्रत्येकाला व्यवसाय करण्याचा अधिकार दिला आहे. महापालिकेने योग्य नियोजन करून फेरीवाल्यांची अडचण दूर करावी, अशी मागणी संयुक्त फेरीवाला संघटना असोसिएशनचे संस्थापक संजय यादवराव यांनी केली आहे.