Maharashtra Rain Updates मुंबई : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत असून सलग तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. पहाटेपासून कोसळत असलेल्या पावसामुळे अनेक भागातील वाहतुकीवर परिणाम झाला असून प्रवाशांची प्रचंड गैरसोय होऊ लागली आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने तेथील वाहतूक अन्य मार्गावर वळविण्यात आली आहे, तर बहुतांश ठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. अंधेरी भुयारी मार्गात पाणी साचल्याने तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच, हिंदमाता, किंग्ज सर्कल, मानखुर्द, वडाळा आदी विविध भागांतील परिसर जलमय झाले आहेत.
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सामान्य नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. सकाळपासूनच अनेक भागांत रस्त्यावर पाणी साचल्याने शेकडो वाहनं अडकली. बेस्टच्या बसमार्गांमध्ये बदल करण्यात आले असून प्रवाशांना तासन्तास थांबून प्रवास करावा लागत आहे. लोकल गाड्याही उशिरा धावत असल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली आहे.
सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे झोपडपट्टी परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. वाहतुकीवर परिणाम झाल्याने नोकरदार वर्गाचीही तारांबळ उडाली असून शाळकरी विद्यार्थ्यांचीही मोठी गैरसोय झाली आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
मुसळधारांमुळे अंधेरी भुयारी मार्गात दोन ते अडीच फूट पाणी साचल्याने दोन्ही वाहिन्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तेथील वाहतूक गोखले पुल व ठाकरे पुल मार्गे वळविण्यात आली आहे. हिंदमाता परिसरातही पाणी साचल्याने महानगरपालिकेने या भागातील सातही पंप सुरू केले असून आवश्यक मनुष्यबळ तैनात केले आहे.
लोखंडवाला सर्कल, दादर टिटी, एससीएलआर, अणुशक्ती नगर, चेंबूर, हिंदमाता जंक्शन (भोईवाडा), वडाळा ‘पूर्वमुक्त मार्गा’वरील पुलावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वाकोला ब्रिज उतरण पानबाई स्कुल दक्षिणवाहिनी आणि हयात जंक्शन येथे एक फूट पाणी साचले असून खार भुयारी मार्गात देखील पाणी साचले आहे. जुहू गल्ली, बर्फिवाला मार्ग जलमय झाला आहे. गांधी मार्केट उत्तरवाहिनी व दक्षिणवाहिनी (माटुंगा) या ठिकाणी एक ते दीड फूट पाणी साचले असून तेथील वाहतूक संथ गतीने सुरु आहे.