मुंबई : मुंबईत दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे गोल देऊळ, गुलालवाडी, वडाळा, शिवडी, नबाब टॅन्क , नागपाडा ,मराठा मंदिर, भायखळा, बावला कंपाऊंड, भोईवाडा, वडाळा स्टेशन चार रस्ता, हिंदमाता जंक्शन, माटुंगा या भागात दीड ते दोन फुटांपर्यंंत पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे. कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणचे सखलभाग जलमय झाले असून त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
मुंबईत सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे दादर टीटी, ट्रॉम्बे, महाराष्ट्र नगर सबवे ,अँटॉप हील ,या ठिकाणी एमजी आर चौक, कानेकर नगर, सरदार नगर, प्रतीक्षा नगर, त्याचप्रमाणे दादर टीटी या भागातही सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे दीड ते दोन फुटांपर्यंत पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे. याशिवाय मालाड सब वे गोरेगांव येथे दीड ते दोन फुटांपर्यंत पाणी साचले असल्याने त्या ठिकाणची वाहतूक एमटीएनएल जंक्शन मार्गे वळवण्यात आली आहे. त्यामुळे तेथील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. याशिवाय दादर टीटी गांधी मार्केट, वरळी नाका उत्तर वाहिनी, वांद्रे बँड स्टँड, जे.जे. मार्ग, हिंदमाता, माटुंगा किंग सर्कल, वाकोला राम नगर सबवे येथे पाणी साचले आहे. त्यामुळे या परिसरात जोडणाऱ्या मार्गिकांवरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. माटुंगा येथील गांधी मार्केट परिसरात दीड फूट पाणी साचले होते, हिंदमाता येथे वाहतूक संथ गतीने सुरू आहे. पायधुनी डीडी जंक्शन येथेही पाणी साचल्याचे पोलिसांनी सांगितले.
याशिवाय पश्चिम उपनगरातील अंधेरी बर्फीवाला रोड, डी .एन. रोड येथे एक फूट पाणी साचले आहे. वाकोला पुलावरील पानबाई स्कूल येथील जंक्शन परिसरात एक फूट पाणी साचले असून खार सब वे येथेही पाणी साचले आहे. पाणी साचल्यामुळे अंधेरी सब वे बंद करण्यात आला असून तेथील वाहतूक इतर ठिकाणी वळवण्यात आली आहे. याशिवाय मालाड सब वे, समता नगर पोईसर सब वे येथेही पाणी साचले आहे. पाणी साचल्याने आरे कार शेड रोडवर मरोळ युनिट क्रमांक १९ (दिंडोशी) कडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. याशिवाय पावसामुळे पश्चिम द्रुतगती मार्ग व पूर्व मुक्त मार्ग येथील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. ठिकठिकाणी वाहने बंद पडल्यामुळेही वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. वडाळा टीटी येथे ट्रक बिघडल्यामुळे तेथील वाहतूकही संथ गतीने सुरू होती. वाहतूक पोलिसांनी सदर ट्रक हटवल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.