मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर कोणीही विशेषाधिकार सांगू शकत नाही, असे उच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. तसेच, अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पुन्हा शिवाजीराजे भोसले” या चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे चित्रपटाचा शुक्रवारी प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

”मी शिवाजीराजे भोसले बोलतोय” या चित्रपटाची निर्माती कंपनी असलेल्या एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट एलएलपीने स्वामित्त्व हक्कांच्या उल्लंघनाचा आरोप करून उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तथापि, न्यायमूर्ती अमित जामसांडेकर यांच्या सुट्टीकालीन एकलपीठाने उपरोक्त टिपण्णी करून कंपनीची याचिका फेटाळली. दोन्ही चित्रपटांच्या पटकथेतील स्वामित्त्व उल्लंघनाचे कंपनीचे आरोप सकृतदर्शनी असमर्थनीय आणि निराधार आहेत, असेही न्यायालयाने कंपनीला दिलासा नाकारताना नमूद केले. कंपनीने शेवटच्या क्षणाला न्यायालयात धाव घेऊन चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगितीची मागणी केली आहे. ती मान्य केली जाऊ शकत नाही, असे देखील न्यायालयाने स्पष्ट केले.

“छत्रपती शिवाजीराजे भोसले” किंवा “छत्रपती शिवाजी महाराज” या नावांवर कंपनी कोणत्याही विशेषाधिकाराचा दावा करू शकत नाही. किंबहुना, महाराजांच्या नावावर कोणीच हक्क किंवा विशेषाधिकार सांगु शकत नाही याचाही न्यायालयाने कंपनीची याचिका फेटाळताना पुनरुच्चार केला.

मराठी चित्रपटप्रेमी सुज्ञ

मांजरेकर यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार देताना हा चित्रपट पूर्णपणे नवीन आहे आणि तो आधीच्या चित्रपटाचे अनुकरण नाही. मराठी चित्रपटांचे सुज्ञ आणि रुचीपूर्ण प्रेक्षक या चित्रपटाच्या शीर्षकासह कंपनीने केलेले आरोप किंवा अन्य कोणत्याही कारणाने गोंधळून जाणारे नाहीत, असे न्यायालयाने पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा करताना प्रामुख्याने नमूद केला.

संवादाची नक्कल करण्याचा प्रश्न नाही

मांजरेकर यांनी अनेक संवादांची नक्कल केली आहे हा कंपनीचा दावाही न्यायालयाने फेटाळला. या चित्रपटातील संवाद नियमित असून त्यातील शब्द हे प्रत्येक मराठी भाषिक व्यक्तीकडून वापरले जातात. तसेच, अभिव्यक्ती विविध मराठी साहित्य, नाटके आणि चित्रपटांचा भाग आहेत, असेही न्यायालयाने नमूद केले.

प्रकरणाची पार्श्वभूमी

‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हा चित्रपट २००९ मध्ये प्रसिद्ध झाला होता. या चित्रपटाची निर्मिती एव्हरेस्ट एंटरटेन्मेट एलएलपी आणि महेश मांजरेकर यांनी संयुक्तपणे मेसर्स अश्वमी फिल्म्सच्या बॅनरखाली केली होती. तसेच, त्यात एव्हरेस्टकडे चित्रपटाचे ६० टक्के आणि महेश मांजरेकर यांच्याकडे ४० टक्के हक्क होते. पुढे, २०१३ मध्ये मांजरेकर यांनी ठराविक आर्थिक मोबदला घेवून त्यांचे ४० टक्के हक्क हे संपूर्णतः एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटला हस्तांतरित केले. त्यामुळे, एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट ही कंपनी ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटाशी संबंधित सर्व बौद्धिक संपदा हक्कांची एकमेव मालक बनली. त्यात प्रीक्वेल, सिक्वेल किंवा इतर मूळ विषयाशी संबंधित कलाकृती तयार करण्याच्या विशेष आणि एकाधिकार हक्कांचा समावेश आहे, असा दावा कंपनीने याचिकेत केला होता.