मुंबई : कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या २०१० मध्ये झालेल्या निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या आरोपांप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते राज ठाकरे यांच्याविरोधात दाखल गुन्हा आणि आरोपपत्र उच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्द केले. त्यामुळे, राज यांना दिलासा मिळाला आहे.
कल्याण- डोंबिवली महानगरपालिका हद्दीत राहण्यासाठी दिलेल्या परवानगीच्या मुदतीनंतरही राज हे मतदारसंघात होते. असे करून त्यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केला, असा आरोप त्यांच्यावर होता. राज्य निवडणूक आयोगाने राज यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा आणि आरोपपत्र दाखल केले होते. गुन्हा आणि आरोपपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी राज यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला होता.
हेही वाचा… मुंबईतील सी लिंकजवळ भीषण अपघात, पळून जाण्याच्या प्रयत्नात दिलेल्या धडकेत ३ जणांचा मृत्यू, ६ जखमी
हेही वाचा… प्रदूषणावर प्रयोग! मुंबईत कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी चाचपणी
न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने राज यांच्या याचिकेवर शुक्रवारी निर्णय देताना त्यांची मागणी मान्य केली. तसेच, त्यांच्याविरोधातील गुन्हा आणि आरोपपत्र रद्द केले. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने १९५१च्या लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत राज यांना नोटीस बजावली होती. कायद्यानुसार, राजकीय नेत्यांना निवडणुकीच्या ४८ तास आधी निवडणूक क्षेत्रात राहण्याची परवानगी नाही.