भ्रष्टाचारप्रकरणी ‘एनसीबी’चे माजी संचालक समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. याविरोधात समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज ( २२ मे ) उच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने समीर वानखेडेंना अटकेपासून दिलासा दिला आहे. याप्रकरणी आता ८ जूनला सुनावणी होणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

समीर वानखेडे यांच्याकडे ‘एनसीबी’च्या मुंबई विभागीय संचालकपदाची जबाबदारी असताना त्यांच्या पथकाने ऑक्टोबर २०२१ मध्ये मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवर छापा घातला होता. या कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही ताब्यात घेण्यात आले होते.

हेही वाचा : आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटींची खंडणी मागितली? समीर वानखेडे म्हणतात, “मला समजत नाहीये की…!”

त्याला सोडवण्यासाठी समीर वानखेडे यांनी २५ कोटींच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपाप्रकरणी ‘एनसीबी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासही केला. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. तपासानंतर सीबीआयने समीर वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्याविरोधात समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

सोमवारी ( २२ मे ) उच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी पार पडली. तेव्हा न्यायालयाने समीर वानखेडे यांना काही अटींवर ८ जूनपर्यंत अटकेपासून दिलासा दिला आहे.

न्यायालयात काय घडलं?

“प्रकरणाशी संबंधित पुरावे माध्यमांना उपलब्ध करून देऊ नये. अन्यथा सीबीआयने कारवाई करावी,” असं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

हेही वाचा : “लोकांच्या घरात घुसून बायका पोरांवर…”, समीर वानखेडे प्रकरणावर पहिल्यांदाच बोलल्या सुप्रिया सुळे; म्हणाल्या, “संसदेत…”

तर, “तपासात सहकार्य आणि पुरव्यांशी छेडछाड करणार नाही. तसेच, तपासाशी संबंधित पुरावे माध्यमांना उपलब्ध न करून देणार नाही,” अशी हमी समीर वानखेडेंनी उच्च न्यायालयात दिली आहे.