मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अंधेरी पश्चिम ते मानखुर्द मेट्रो २ ब मार्गिकेच्या खांबांखाली २०० कोटी रुपये खर्च करून बॉलीवूड थीम पार्क साकारले जाणार असून त्या माध्यमातून भारतीय चित्रपट सृष्टीचा गेल्या शंभर वर्षांचा इतिहासपट मांडण्यात येणार आहे. या बाॅलीवूड थीम पार्कच्या कामाचे भूमिपूजन मुंबई भाजपा अध्यक्ष आणि स्थानिक आमदार अ‍ॅड आशिष शेलार यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. या कामाचे भूमिपूजन बरेच दिवस रखडले होते. मात्र आता ते झाल्याने या प्रकल्पाच्या कामाचा मार्ग मोकळा होऊन कामास अखेर सुरुवात झाली आहे.

एमएमआरडीएकडून २३.६४३ किमी लांबीच्या अंधेरी पश्चिम – मंडाळे मार्गिकेचे काम सध्या वेगात सुरु आहे. ही मार्गिका एस.व्ही. रोड येथून जात असून परिसरात हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, लेखक, निर्माते, गायक रहातात. बॅन्ड स्टँन्ड, माऊंट मेरी आणि अन्य चर्च, वांद्रे किल्ला, जुन्या आठवणी जपणारे वांद्रे रेल्वे स्थानक येथे असून ही पर्यटकांची आकर्षण केंद्र आहेत. पाली हिल, कार्टर रोड या परिसरात चित्रपट कलाकारांना पहायला येणाऱ्या पर्यटकांची नेहमीच रेलचेल राहते. एकूणच भारतीय चित्रपट सृष्टीचे आणि वांद्रे पश्चिम परिसराचे नाते घट्ट आहे. तेव्हा चित्रपट सृष्टीचा हा इतिहास एका वेगळ्या माध्यमातून उलगडण्यासाठी बॉलिवूड थीम पार्कची संकल्पना शेलार यांनी मांडली होती. मेट्रो २ ब मार्गिकेतील ईएसआयसी नगर ते वांद्रे दरम्यानच्या सात मेट्रो स्थानकातील ३५५ खांबांमधील मोकळ्या जागेत हे थीम पार्क साकारले जाणार आहे.

हेही वाचा – Lalbaug Accident : मद्यधुंद प्रवाशामुळे नुपूर मणियारचा मृत्यू, लालबागच्या अपघातात कुटुंबाने कर्ती लेक गमावली

हेही वाचा – Mumbai Local Train Update : पश्चिम रेल्वे, हार्बर मार्ग विस्कळीत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिल्प, एलईडी दिवे, डिजिटल आणि अद्यावात तंत्रज्ञानाचा वापर करुन बॉलीवूड थिम साकारुन भारतीय चित्रपट सृष्टीचा गेल्या शंभर वर्षांचा इतिहास उलगडून दाखवण्यात येणार आहे. या थीम पार्कमुळे या परिसराचे सौंदर्य वाढणार असून पर्यटकांचे खास आकर्षण ठरेल असा दावा केला जात आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील १९१३ ते २०२३ या मोठ्या कालखंडाचा विचार करुन त्या कालखंडातील महत्वाच्या घटना, सिनेमा, त्यातील कलाकार, आणि चित्रपटातील प्रसंगावर या थिम पार्कची रचना करण्यात येणार आहे. अशा या बाॅलीवूड थीम पार्कचे भूमिपूजन मार्चमध्ये करत कामास सुरुवात करण्याचे नियोजन होते. मात्र काही कारणाने भूमिपूजनास विलंब झाला होता. पण आता मात्र भूमिपूजन मार्गी लागले आहे. सोमवारी शेलार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. भूमिपूजन मार्गी लागल्याने आता या थीमपार्कच्या कामास सुरुवात झाली आहे. तेव्हा हे थीम पार्क कार्यान्वित झाल्यास रविवारी सकाळी रस्त्याचा काही भाग वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केला जाईल आणि बॉलीवूड थीम हॅपी स्ट्रीट कार्यक्रम सुरू केला जाईल. या जागेवर चित्रपट प्रमोशनसह चित्रपट सृष्टीशी संबंधित अनेक उपक्रम हाती घेतले जाऊ शकतात. त्यामुळे मेट्रोचे उत्पन्नही वाढण्यास मदत होणार असल्याचा दावा यानिमित्ताने केला जात आहे.