मुंबई : मुंबईतील १२ हजार ५०० हून अधिक घरांची जुलैमध्ये विक्री झाली. राज्य सरकारला या घरविक्रीतून मुद्रांक शुल्कापोटी १११४ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. मे, जूनच्या तुलनेत जुलैमध्ये घरांच्या विक्रीत वाढ झाली आहे. जुलैमध्ये एक हजारांहून अधिक घरांची विक्री झाली आहे. त्याचबरोबर मे आणि जूनच्या तुलनेत जुलैमध्ये महसुलातही मोठी वाढ झाली आहे.
जानेवारी – जून या सहामाहीत घर विक्री समाधानकारक राहिली आहे. सहा महिन्यांच्या कालावधील ७५ हजारांहून अधिक घरांची विक्री झाली आहे. मागील वर्षाच्या तुलने यावर्षी सहामाहीत घरांच्या विक्रीत ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारी – जूनदरम्यान ७ हजार ५०० घरांची विक्री झाली होती. यावर्षी या सहामाहीत घर विक्रीने ७५ हजारांचा टप्पा पार केला आहे. तर घरांच्या विक्रीबरोबरच महसुलातही चांगली वाढ झाली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत जानेवारी – जूनदरम्यान महसुलात १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ५८७४ कोटी रुपये इतका महसूल पहिल्या सहा महिन्यात मिळाला होता. यंदा पहिल्या सहा महिन्यांत ६ हजार ७२७ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. आता जुलैमध्येही घरांच्या विक्रीत चांगली वाढ झाली आहे.
जानेवारी, फेब्रुवारीमध्ये घर विक्रीने १२ हजारांचा टप्पा पार केला होता. तर मार्चमध्ये घर विक्रीने साडेपंधरा हजारांचा टप्पा गाठला होता. एप्रिलमध्ये १३ हजार घरांची विक्री झाली होती. तर मार्च, एप्रिलमध्ये महसुलातही चांगली वाढ झाली होती. मात्र मे आणि जूनमध्ये घर विक्री १२ हजारांचा टप्पा पार करू शकली नव्हती. मेमध्ये ११ हजार ५६५, तर जूनमध्ये ११ हजार ५९९ घरांची विक्री झाली होती. या दोन्ही महिन्यांतील महसूल एक हजार कोटींपेक्षा अधिक होता. पण आता जुलैमध्ये मात्र घरांच्या विक्री पुन्हा चांगली वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.
जुलैमध्ये १२ हजार ५०० हून अधिक घरांची विक्री झाली आहे. या घर विक्रीतून राज्य सरकारला १११४ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. गृहकर्जाच्या व्याजदरात झालेल्या कपातीमुळे घरांच्या विक्रीत वाढ होताना दिसत आहे. आता सणासुदीचा काळ सुरू होणार असून या काळात घर विक्रीत आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा अजमेरा समूहाचे धवल अजमेरा यांनी व्यक्त केली.