मुंबई : मुंबईमध्ये २६ मे रोजी झालेल्या मुसळधार पावसामध्ये केईएम रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता विभाग व रुग्णकक्ष ४ अ मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या प्रकरणाची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने महानगरपालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. त्याची दखल घेऊन प्रशासनाने प्रथमच रुग्णालयामध्ये पावसाचे पाणी शिरू नये यासाठी विशेष तुकडी सज्ज केली आहे.
केईएम रुग्णालयामधील बालरोग अतिदक्षता विभाग आणि रुग्णकक्ष ४ अ या विभागामध्ये पाणी शिरल्याने सर्वच स्तरातून टीका झाली होती. पावसाच्या पाण्यामुळे रुग्णकक्षातील रुग्ण व नातेवाईक यांना समस्येचा सामना करावा लागला होता. या घटनेवर मुंबई उच्च न्यायालयाने केईएम रुग्णालय प्रशासन व मुंबई महानगरपालिका प्रशासनावर जोरदार टीका केली.
केईएम रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील व्हरांड्यामधून २६ मेनंतर २१ जुलै रोजी सकाळी रुग्णकक्ष ९ मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. रुग्णकक्षामध्ये सफाई कामगारच नसल्याने सायंकाळपर्यंत पाणी साचून राहिले होते. दुपारी ४ नंतर रुग्णकक्षातील पाणी काढण्यात आले. पावसाच्या पाण्यामुळे सर्वत्र ओल झाल्याने पाय घसरून पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. रुग्णांचे नातेवाईक सकाळपासून वारंवार रुग्णकक्षात साचलेले पाणी काढण्याची विनवणी करीत होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.
एकूण परिस्थितीची दखल घेऊन केईएम रुग्णालय प्रशासनाने पावसाळ्यामध्ये रुग्णकक्षामध्ये पाणी शिरू नये यासाठी कर्मचाऱ्यांची विशेष तुकडी तयार केली आहे. पाणी तुंबण्याच्या घटना रोखण्यासाठी जूनमध्ये १५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्यके पाळीमध्ये पाच कर्मचारी तैनात असणार असून, हे कर्मचारी तिन्ही पाळ्यांमध्ये काम करीत आहेत. साचणारे पावसाचे पाणी तातडीने काढण्यासाठी रुग्णालयामध्ये सहा पंप बसविण्यात आले आहेत. पाणी साचणाऱ्या भागांमध्ये हे पंप बसविण्यात आल्याची माहिती केईएम रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, यंदा २६ मे आणि २१ जुलै रोजी केईएम रुग्णालयाच्या रुग्णकक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.