मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५,२८५ घरांसह ७७ भूखंडाच्या सोडतीसाठी नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार अनामत रक्कमेचा भरणा करून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत गुरुवार, १४ ऑगस्टला संपुष्टात येणार आहे. मात्र त्याआधीच मंडळाने नोंदणी, अर्जविक्री, स्वीकृतीला १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. आता इच्छुकांना २८ ऑगस्टपर्यंत अनामत रक्कमेसह अर्ज भरता येणार आहे. नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला मुदतवाढ दिल्याने आता ३ सप्टेंबर रोजी काढण्यात येणारी सोडतही पुढे गेली आहे. आता १८ सप्टेंबरला सोडत काढण्यात येणार आहे.

कोकण मंडळाने २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील ५६५ घरे, १५ टक्के एकात्मिक योजनेतील ३००२ घरे, म्हाडा योजनेतील १६७७ घरे, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत असलेली ४१ घरे अशा एकूण ५,२८५ घरांसाठी १४ जुलैपासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात केली आहे. या सोडतीत ७७ भूखंडाचीही समावेश आहे. सोडतीच्या वेळापत्रकानुसार १३ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. तर १४ ऑगस्टला अनामत रक्कमेसह अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत होती.

अर्ज भरण्याची प्रक्रिया संपल्यानंतर पुढील कार्यवाही करून ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ३ सप्टेंबर रोजी सोडत काढण्यात येणार होती. मात्र आता ही सोडत ३ सप्टेंबरऐवजी १८ सप्टेंबर रोजी काढण्यात येणार असल्याची माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली. सोडतीच्या नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्जदारांना १४ ऑगस्टऐवजी आता २८ ऑगस्टपर्यंत अनामत रक्कमेसह अर्ज भरता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सोडतपूर्व प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आल्याने सोडतीची तारीख ३ सप्टेंबऐवजी ११ सप्टेंबर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

सोडतीत १५ टक्के एकात्मिक योजनेतील सर्वाधिक ३००२ घरांचा समावेश आहे. मात्र याच घरांना सर्वात कमी प्रतिसाद मिळाला आहे. ३००२ घरांसाठी मंगळवारपर्यंत अनामत रक्कमेसह केवळ १३९१ अर्ज सादर झाले आहेत. तर दुसरीकडे म्हाडा योजनेतील १६७७ घरांसाठी अनामत रक्कमेसह १६०० हून अधिक अर्ज सादर झाले आहेत. हा प्रतिसादही खूपच कमी आहे. त्यामुळेच नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती मुदतवाढ देण्यात आल्याचेही गायकर यांनी सांगितले.

एकात्मिक योजनेतील आणि म्हाडा योजनेतील घरांना प्रतिसाद मिळाला नसला तरी सोडतीतील २० टक्के योजनेतील ५६५ घरांना मात्र चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ५६५ घरांसाठी अनामत रक्कमेसह ४० हजार २४० अर्ज सादर झाले आहेत. खासगी विकासकांच्या प्रकल्पातील ही घरे असून या घरांना नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो. त्यानुसार यंदाही अर्जदारांनी या घरांना चांगली पसंती दिल्याचे चित्र आहे. त्याचवेळी ७७ भूंखडांनाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या भूखंडांसाठी अंदाजे ४०० अर्ज सादर झाल्याचेही गायकर यांनी सांगितले.