मुंबई : कोकण रेल्वेवरून देशातील पहिली रोल-ऑन रोल-ऑफ (रो-रो) कार सेवा २३ ऑगस्ट रोजी चालवण्यात येणार आहे. परंतु १६ पेक्षा कमी वाहने असल्यास ही सेवा रद्द करण्याची घोषणा केली होती. मात्र या सेवेसाठी आतापर्यंत फक्त पाच जणांनी आरक्षण केले आहे. तर, २२ ऑगस्टपर्यंत या सेवेचे आरक्षणाची अंतिम मुदत आहे. या सेवेसाठी १६ पेक्षा कमी आरक्षण झाले तरीही रो-रो कार सेवा धावेल, असे कोकण रेल्वेने जाहीर केले आहे. त्यामुळे देशातील पहिली रो-रो कार सेवा धावण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

कोकणातील प्रवास खड्डेमुक्त होण्यासाठी, रेल्वेगाडीच्या आरक्षणासाठी करावी लागणाऱ्या धावपळीतून सुटका करण्यासाठी, इंधन खर्चात बचतीसह पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी रो-रो कार सेवा खूप उपयुक्त आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने रायगडमधील कोलाड ते गोव्यातील वेर्णादरम्यान रो-रो कार सेवेचे आरक्षण २१ जुलै रोजीपासून सुरू केले. परंतु, ऑगस्ट २०२५ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत सानपाड्यातील एकाच प्रवाशाने रो-रो कार सेवेचे आरक्षण केले. तर, ५० हून अधिक प्रवाशांनी चौकशी केली. तर, आतापर्यंत कोकणात जाणाऱ्या तीन प्रवाशांनी आरक्षण केले असून अप आणि डाऊन मार्गासाठी एकूण पाच प्रवाशांनी आरक्षण केले आहे. रो-रो सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद वाढविण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने सिंधुदुर्गमधील नांदगाव रोड येथील एक थांबा वाढविला. तसेच आरक्षणाचा कालावधी २० ऑगस्ट केला. त्यानंतर हा कालावधी २२ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आला आहे.

१६ पेक्षा कमी वाहने असल्यास रो-रो कार सेवा फेरी रद्द केली जाणार होती. परंतु, कोकणात जाणारी २३ ऑगस्ट रोजीची पहिली रो-रो कार फेरी धावणार आहे. या सेवेसाठी कमीत कमी कितीही कारचे आरक्षण झाले तरीही, रो-रो कार फेरी चालविण्यात येणार आहे. त्यापुढील रो-रो कार फेरीसाठी कार आरक्षणाची संख्या अपुरी असल्यास फेरी रद्द केल जाईल. – सुनील नारकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे

२४ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यानच्या रो-रो कार सेवेच्या प्रवासासाठी तीन दिवस आधी आरक्षण केले जाईल. १ सप्टेंबर रोजी रो-रो कार सेवा धावणार असल्यास, या सेवेचे आरक्षण २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद होईल, अशी माहिती कोकण रेल्वेने दिली.