मुंबई : बदलती जीवनशैली, मानसिक तणाव, अपुरी झोप याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून त्यात उच्चरक्तदाब असलेल्या रुग्णांची संख्या अन्य आजारांच्या तुलनेत अधिक आहे.राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ३० वर्षांवरील नागरिकांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यात येते. या कार्यक्रमांतर्गत सन २०२४-२५ या मध्ये १,३६,४५,९९४ नागरिकांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यात आली, त्यापैकी २३,८७,३०८ रुग्णांना उच्च रक्तदाब असल्याचे निदान करण्यात आले असून त्यांच्यावर आरोग्य विभागामार्फत पाठपुरावा करून उपचार करण्यात येत आहेत. या वर्षी १६ मे पर्यंत ३१,२३,९२१ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी उच्च रक्तदाबाचे निदान झालेल्या ५,१०,६३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रमांतर्गत, तृतीयक केंद्रे, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या स्तरावर आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. असंसर्गजन्य रोग (नॉन कम्युनिकेबल डिसीज – एनसीडी) हा एक आजार आहे, जो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संक्रमित होत नाहीत. यानुसार असंसर्गजन्य आजारांमध्ये कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आदी आजारांचा समावेश होतो. असंसर्गजन्य आजाराची लक्षणे दिसून आल्यानंतर वैद्यकीय उपचार सुरू करणे हा सर्वांत महत्त्वाचा टप्पा असतो. प्राथमिक अवस्थेत निदान झाल्यास या आजारांवर नियंत्रण मिळविणे आणि उपचाराने हे आजार बरे होतात असे डॉक्टरांनी सांगितले.
रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी वेळीच निदान होणे गरजेचे असून त्यासाठी नियमित तपासणी आवश्यक आहे. राज्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये उच्च रक्तदाब चाचणी आणि उपचार मोफत उपलब्ध आहेत. नागरिकांनी या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
उच्च रक्तदाबाची काही प्रमुख लक्षणे असून यात डोकेदुखी,छातीत दुखणे, चक्कर येणे, दृष्टीभ्रम,नाकातून रक्त येणे, थकवा,हृदयाची धडधड, श्वासोच्छ्वासाला त्रास,धाप लागताना दिसते. उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवणे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी-आहारामध्ये तेल, तुप व मीठ यांचा कमी प्रमाणात वापर करावा.संतुलित आहार, फळे, भाज्या यांचे भरपूर प्रमाणात सेवन करावे,तंबाखू आणि मद्य सेवन टाळावे,नियमित व्यायाम अथवा योगासने करावी. वजन नियंत्रित ठेवावे. तसेच रक्तदाबाची नियमित चाचणी करून आवश्यकतेनुसार डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.