Mumbai Local News: मस्जिद बंदर येथे कर्नाक पूलावर गर्डर बसविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी वाहतूक बाधित झाली आहे. हा गर्डर पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकविण्याचे काम सुरू आहे. रात्रीपासून गर्डर टाकण्याचे काम सुरू होते. मात्र अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे लोकल वाहतूक पूर्ववत करण्यात आलेली नाही. आज प्रजासत्ताक दिन असल्यामुळे अनेक शासकीय आणि शाळा, महाविद्यालयातील कर्मचारी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी सकाळीच घराबाहेर पडले होते. मात्र अनेकांना आता वेळेत पोहोचता येणार नाही. दादर स्थानकाच्या अलीकडे एकामागोमाग लोकल थांबल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक प्रवाशी ट्रॅकवर उतरून पायी चालत जात आहेत.

शनिवारी रात्री गर्डर टाकण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. मात्र काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानंतर हे काम निहित वेळेत पूर्ण झालेले नाही. त्यामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा बाधित झाली.

मध्य रेल्वेने एक्सवर पोस्ट करत कर्नाक पूलासाठी घेतलेला मेगा ब्लॉक संपला नसल्याचे सांगितले आहे. तसेच भायखळा ते दादर लोकल सुरू करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच हार्बर मार्गावरील वाहतूक केवळ वडाळा स्थानकापर्यंतच सुरू आहे. सीएसएमटी, दादर, वडाळा आणि भायखळा स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी बसेसची व्यवस्था सुरू करण्यात आलेली असल्याचेही मध्य रेल्वेने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच पश्चिम रेल्वेवर वांद्रे ते माहिम दरम्यान शनिवारी आणि रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. यासाठी विरार-बोरीवलीहून निघालेल्या लोकल सकाळपर्यंत फक्त अंधेरी स्थानकापर्यंत धावत होत्या. त्यामुळे शनिवारप्रमाणेच आजही अंधेरी स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. थोड्यावेळापूर्वीच पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्ववत केल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.