मुंबई : मालाड आणि कांदिवलीमध्ये दोन नवीन जोडरस्ते तयार करण्यात येणार आहेत. वर्सोवा – दहिसर सागरी किनारा मार्गाला पूरक असे हे रस्ते आहेत. त्यामुळे मालाड, कांदिवलीतील रहिवाशांना सागरी किनारा मार्गावरून थेट मुंबईत जाता येणार आहे. या प्रकल्पासाठी २२०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून मुंबई महापालिकेच्या पूल विभागाने याकरीता निविदा मागवल्या आहेत.
पश्चिम उपनगरातील मालाड, कांदिवली परिसरातील वाहतूक येत्या काही वर्षात सुसह्य होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने या भागात काही जोडरस्ते, काही नवीन रस्ते तयार करण्याचे ठरवले आहे. या कामासाठी मुंबई महापालिकेने निविदा मागवल्या आहेत. त्यात एक उन्नत रस्ता आणि एक नवीन रस्ता तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पांचे काम लवकरच सुरू होणार आहे.
याबाबत मुंबई महापालिकेच्या पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मालाड येथील इन्फिनिटी मॉलपासून मालवणीपर्यंत एक उन्नत मार्ग तयार करण्यात येणार आहे. एमडीपी रोडपासून रायन इन्टरनॅशनल स्कूलला जोडणाऱ्या रामचंद्र नाल्यावर हा उन्नत मार्ग म्हणजेच पूल उभारण्यात येणार आहे. हा केबल स्टे पद्धतीचा स्टीलचा पूल असेल. हे काम सीआरझेडमध्ये येत असल्यामुळे खाडीला अडथळा न करता ४५० मीटर लांबीचा केबल स्टे पूल उभारण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
दुसरा प्रकल्प मिसिंग लिंक जोडण्याचा आहे. यामध्ये कांदिवली चारकोप जंक्शनपासून रायन इन्टरनॅशनल शाळेपर्यंत एक नवीन रस्ता बांधण्यात येणार आहे. हा रस्ता भविष्यात तयार होणाऱ्या वर्सोवा – दहिसर सागरी किनारा मार्गासाठी पूरक रस्ता आहे. त्यामुळे मालाड, चारकोपमधील नागरिकांना विनाअडथळा सागरी किनारा मार्गावर येता येणार आहे. तसेच याचबरोबर महाकाली जंक्शन – चारकोप नाका दरम्यान मालाड–मार्वे रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी टाळता येणार आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी २२०० कोटीं रुपये खर्च अपेक्षित आहे. आगामी सागरी किनारा मार्ग प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर मीठ चौकी व एव्हरशाईन नगर भागातील वाहतूक व्यवस्थापनासाठी हे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत.
तीन – साडेतीन वर्षांत काम पूर्ण करण्याचे उद्दीष्ट
रामचंद्र नाल्यावरील पुलासाठी सीआरझेडची परवानगी मिळाली असून काम सुरू करण्यासाठी लवकरच उच्च न्यायालयाचीही परवानगी मिळणार आहे. त्यामुळे सहा ते सात महिन्यात ही कामे सुरू होऊ शकतील व तीन – साडेतीन वर्षांत ही कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे.