मुंबई: ऑनलाईनवर भाड्याचे घर शोधणाऱ्या एका व्यक्तीला भामट्याने तीन लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना विक्रोळी येथे घडली. याप्रकरणी पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरवात केली आहे.
श्रीराम नटराजन (४२) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते विक्रोळी परिसरात भाड्याच्या घरात राहतात. भाड्याच्या घराचा करारनामा संपत असल्याने ते परिसरात दुसरे घर शोधत होते. एका ऑनलाईन ॲपवर विक्रोळी परिसरातील एक घर भाड्याने देण्यासंबंधीची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी त्यावरील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्यानुसार संबंधित व्यक्तीने नटराजन यांना एक घर दाखवले. २ लाख ८० हजार रुपये अनामत रक्कम आणि महिना ४३ हजार रुपये भाडे द्यावे लागेल, असे त्यांना सांगण्यात आले.
आरोपीने तत्काळ नटराजन यांना एक बँक खाते क्रमांक पाठवून त्यावर २ लाख ८० हजार रुपये पाठवण्यास सांगितले. नटराजन यांनी खात्री न करताच आरोपीने दिलेल्या बँक खात्यात पैसे पाठवले. मात्र त्यानंतर आरोपीने त्याचा मोबाइल क्रमांक बंद केला. याचदरम्यान केलेल्या चौकशीत त्यांना दाखवलेले घर दुसऱ्याच व्यक्तीचे असल्याचे समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याप्रकरणी पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.