मुंबईः बेल्जियममधून आंतरराष्ट्रीय टपालाद्वारे एमडीएमए (एक्स्टसी) अंमली पदार्थ मागवल्याच्या आरोपाखाली सीमाशुल्क विभागाने मुंबईतून एका तरूणाला अटक केली. सीमाशुल्क विभागाने या कारवाईत सुमारे एक किलो एमडीएमए जप्त केले होते. त्याची किंमत सुमारे दोन कोटी रुपये आहे. एका नायजेरियन नागरिकाने परदेशातून टपालाद्वारे अमली पदार्थ मागवले होते. ते खरेदी करण्यासाठी कूट चलनाचा वापर करण्यात आल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे.

इरशाद रशीद मेमन असे अटक आरोपीचे नाव असून तो बोरिवली पूर्व येथील काजूपाडा परिसरातील रहिवासी आहे. बेल्जियम येथून आंतरराष्ट्रीय टपालाद्वारे संशयीत वस्तू आल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सीमाशुल्क विभागाने फेब्रुवारी महिन्यात एका पार्सलची तपासणी केली. त्यावेळी त्यात ९७५ ग्रॅम एमडीएमए अमली पदार्थ सापडले. ते पार्सल बोरिवली येथील रशीद मेमन या व्यक्तीच्या नावाने आले होते. सीमाशुल्क विभागाने टपाल कर्मचाऱ्यांच्या मदतीने तेथे जाऊन पार्सल देण्याचा प्रयत्न केला. पण रशीद मेेमनने आपण अशा कोणत्याही प्रकारचे पार्सल परदेशातून मागवले नसल्याचे सांगून ते स्वीकारण्यास नकार दिला. त्यांचा मुलगा इरशाद मेमनने त्यांच्या नावावर टपाल मागवल्याचे रशीदने सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी इरशादला समन्स पाठवला. पण तो वारंवार चौकशीला अनुपस्थित राहत होता. इरशादविरोधात दहिसर पोलीस ठाण्यात गांजा तस्करीचा गुन्हा असून न्यायालयाच्या आदेशाने त्याला दहिसर पोलीस ठाण्यात हजेरीसाठी जावे लागत असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्याला तेथे समन्स बजावून सीमाशुल्क विभागात चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले. चौकशीत आरोपीचा गुन्ह्यांतील सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली. आरोपीच्या चौकशीत एका नायजेरियन नागरिकाने संबंधित टपालाची नोंद केल्याचे सांगितले. त्याबाबत आरोपी इरशादला चांगली रक्कम देण्याचे आमिषही नायजेरियन नागरिकाने दाखवले होते.

अंमली पदार्थ तस्करीसाठी टपालाचा कसा वापर होतो ?

बीटकॉईनसारख्या कूट चलनाच्या सहाय्याने अंमली पदार्थांच्या खरेदी – विक्रीचा व्यवहार होतो. अंमली पदार्थ खरेदी विक्री व्यवहार दिसतो तितका सोपा नाही. डार्क आणि डिप अशा दोन प्रकारात हा व्यवहार होतो. इंटरनेटवरील या तस्करांच्या साईटवर मेंबरशिप घ्यावी लागते. बीट काईनवर ही मेंबरशीप मिळते. या इंटरनेट साईटवर मेंबर होण्यासाठी बीट काईन खरेदी करावे लागतात. मात्र नुसते बीटकॉईन खरेदी करून देखील सदस्य केले जाईल याची कोणतीही खात्री नसते. जोपर्यंत या तस्करांना तुम्ही खरेच अमली पदार्थाच्या खरेदीसाठी सदस्य बनत आहात याची खात्री पटत नाही. तोपर्यंत तुम्हाला सदस्य करून घेतले जात नाही. डार्कनेटवर असे क्रमांक व लिंक्स उपलब्ध आहेत. त्यामार्फत मेसेंजरद्वारे अंमली पदार्थ मागवले जाऊ शकतात. त्याची रक्कमही आभासी चलनामार्फत दिली जाते. या कोणत्याही व्यवहारात विक्रेत्याचा प्रत्यक्ष सहभाग येत नसल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. त्याच्या वितरणासाठी कुरियर व आंतरराष्ट्रीय टपास सेवेचा वापर होत असल्यामुळे ग्राहक व विक्रेता यांच्यात कोणाताही संबंध उतर नाही. परिणामी मुख्य आरोपींपर्यंत पोहोचणे जवळपास अशक्य झाले आहे.