मुंबई : अंधेरी पश्चिम ते मंडाले मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले या ५.६ किमीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ८ आॅक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे नियोजने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) होते. मात्र पहिल्या टप्प्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त न झाल्याने त्यावेळेस लोकार्पण रखडले. तर आता या टप्प्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे, मात्र लोकार्पणासाठी पंतप्रधानांची वेळ मिळत नसल्याने लोकार्पण रखडल्याचे चित्र आहे. डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्यासाठी पूर्णत: सज्ज आहे, मात्र केवळ लोकार्पणाअभावी पूर्व उपनगरवासियांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न लांबणीवर पडले आहे.
दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ मार्गिकेचा विस्तार अंधेरी पश्चिम ते मंडाले असा मेट्रो २ ब मार्गिकेद्वारे केला जात आहे. २०२७ पर्यंत मेट्रो २ मार्गिके पूर्ण क्षमतेने सेवेत दाखल करण्याचे उद्दिष्ट एमएमआरडीएने ठेवले आहे. त्यानुसार एमएमआरडीएकडून कामाला वेग देण्यात आला आहे. या मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा डिसेंबरपर्यंत सुरु करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन होते. मात्र त्याआधीच काम पूर्ण झाल्याने तसेच मेट्रो आयुक्त,मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस)यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने हा टप्पा आॅक्टोबरमध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नवी मुंबई विमानतळाच्या लोकार्पणाच्या दिवशीच, ८ आॅक्टोबरला पंतप्रधानांच्या हस्ते या टप्प्याचे लोकार्पण करण्याची तयारीही सुरु होती. मात्र ८ आॅक्टोबरपर्यंत सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता नसल्याने लोकार्पणाचा मुहुर्त चुकला. पण आता मात्र या टप्प्याला सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने ३० वा ३१ आॅक्टोबरला पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्याची तयारी राज्य सरकार तसेच एमएमआरडीएने सुरु केली. पंतप्रधानांकडे यासाठी वेळही मागण्यात आली आहे. मात्र ३० आणि ३१ आॅक्टोबरचा दिवस तोंडावर आला असतानाही लोकार्पणाची घोषणा झालेली नाही. तर लोकार्पण पुन्हा लांबणीवर पडल्याची माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली आहे.
सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मेट्रो सुरु करण्याचा मार्ग मोकळा होता. या टप्प्यासाठी १० दिवसांपूर्वीच सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. पण केवळ लोकार्पणासाठी पंतप्रधानांची वेळ मिळत नसल्याने लोकार्पण लांबवणीवर पडल्याचे सूत्रांनी सांगितले. मेट्रो पूर्णपणे सज्ज असतानाही केवळ लोकार्पण न झाल्याने पूर्व उपनगरवासियांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न लांबणीवर पडत आहे. तेव्हा आता या टप्प्याच्या लोकार्पणासाठी केव्हा वेळ मिळते आणि हा टप्पा वाहतूक सेवेत केव्हा दाखल होतो याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
