मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ प्रकल्पातील आरे – बीकेसी टप्पा ऑक्टोबरमध्ये, तर आरे – कफ परेड टप्पा एप्रिल २०२५ मध्ये सेवेत दाखल होणार आहे. ही ३३.५ किमी लांबीची मेट्रो मार्गिका सेवेत दाखल झाल्यानंतर मुंबई महानगर प्रदेशातील पुढील मेट्रो मार्गिकांसाठी प्रवाशांना २०२६ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून सध्या सहा मेट्रो मार्गिकांची कामे सुरू असून यापैकी ‘मेट्रो २ ब’, ‘मेट्रो ४’ आणि ‘मेट्रो ९’ मार्गिकांच्या पहिल्या टप्प्यातील कामे डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. सुरक्षा प्रमाणपत्र घेतल्यानंतर या मार्गिकांचा पहिला टप्पा सेवेत दाखल होण्यासाठी एप्रिल – मे २०२६ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. तर मुंबई महानगर प्रेदशातील ३३७ किमी लांबीचे मेट्रोचे जाळे पूर्ण होण्यासाठी २०३१-३२ उजाडण्याची शक्यता आहे.

एमएमआरडीएच्या ३३७ किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील ‘मेट्रो ३’ आणि ‘मेट्रो ११’ (वडाळा – सीएसएमटी) मार्गिकांच्या कामाची जबाबदारी मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनकडे (एमएमआरसी) आहे. उर्वरित मार्गिकांची अंमलबजावणी एमएमआरडीएकडून करण्यात येत आहे. ‘घाटकोपर – वर्सोवा मेट्रो १’, ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ असे एकूण ४७ किमी लांबीचे मेट्रो जाळे सध्या कार्यान्वित आहे. आता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ‘मेट्रो ३’ प्रकल्पातील आरे – बीकेसी दरम्यानचा १२.४४ किमी लांबीचा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. तर एप्रिल २०२५ मध्ये आरे – कफ परेड दरम्यानचा दुसरा टप्पा कार्यान्वित होणार आहे. एकूणच एप्रिल २०२५ मध्ये मुंबईत ७९ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकेचे जाळे पूर्ण होईल. मात्र ‘मेट्रो ३’नंतर पुढील मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होण्यासाठी एप्रिल – मे २०२६ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हेही वाचा : धारावी मशिद तोडक कारवाई: मुस्लिम समुदायाला लक्ष्य केल्याचा आरोप, सपा आमदार रईस शेख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

एमएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्पाच्या प्रगती अहवालानुसार सध्या एमएमआरडीए ‘मेट्रो २ ब’ (डीएन नगर – मंडाळे), ‘मेट्रो ४’ (वडाळा – कासारवडवली), ‘मेट्रो ४ अ’ (कासारवडवली – गायमूख), ‘मेट्रो ५’ (ठाणे – कल्याण – भिवंडी), ‘मेट्रो ६’ (स्वामी समर्थ नगर – विक्रोळी), ‘मेट्रो ७ अ’ (अंधेरी पूर्व – विमानतळ) आणि ‘मेट्रो ९’ (दहिसर – मिरारोड) मार्गिकांची कामे करीत आहे. या सर्व प्रकल्पास कारशेड, करोना संकट आणि इतर तांत्रिक कारणांमुळे विलंब झाला आहे. पण आता मात्र सहाही मेट्रोंच्या कामांनी वेग घेतला आहे. तर ‘मेट्रो २ ब’, ‘मेट्रो ४’ आणि ‘मेट्रो ९’ मार्गिकांची कामे दोन टप्प्यात पूर्ण करून पहिला टप्पा शक्य तितक्या लवकर वाहतूक सेवेत दाखल करण्याचा प्रयत्न एमएमआरडीएचा आहे. त्यानुसार ‘मेट्रो २ ब’चे आतापर्यंत ७५ टक्के बांधकाम पूर्ण झाले असून यातील मंडळा – चेंबूर दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे १०० टक्के काम डिसेंबर २०२५ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तर ‘मेट्रो ४’चे ७० टक्के काम पूर्ण झाले असून यापैकी कापूरबावडी – जेव्हीएलआर दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे कामही डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्याचवेळी ‘मेट्रो ९’चे ९० टक्के काम पूर्ण झाले असून दहिसर – काशीगाव दरम्यानचा पहिला टप्पाही डिसेंबर २०२५ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे. ‘मेट्रो ४ अ’चे ७५ टक्के काम पूर्ण झाले असून २.६६८ किमी लांबीच्या या मार्गिकेचे बांधकामही डिसेंबर २०२५ मध्ये पूर्ण होणार आहे. या मार्गिकांची कामे पूर्ण झाल्यानंतर सुरक्षा प्रमाणपत्र घेऊन एप्रिल – मे २०२६ पर्यंत या मार्गिका वाहतूक सेवेत दाखल केल्या जाण्याची शक्यता आहे.

एकूणच पुढील दीड वर्षाच्या काळात मुंबई – ठाणे, मुंबई – मिरारोड मेट्रोने जोडले जाणार आहे. मेट्रोचे जाळे विस्तारीत होणार आहे. त्याचवेळी ‘मेट्रो ६’, ‘मेट्रो ५’ मार्गिकेतील कापूरबावडी – धामणकर नाका या पहिल्या टप्प्याचे, ‘मेट्रो २ ब’मधील चेंबूर – डीएन नगर दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्याचे आणि ‘मेट्रो ९’ मार्गिकेतील काशीगाव – डोंगरी दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्याचे आणि ‘मेट्रो ७ अ’चे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. त्यामुळे या मार्गिका २०२७ मध्ये सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी ‘मेट्रो ५’मधील दुसऱ्या टप्प्याचे काम जून २०९ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. उर्वरित मेट्रो मार्गिकांची कामे २०३१-३२ पर्यंत पूर्ण होऊन मुंबई महानगर प्रदेशातील ३३७ किमी लांबीचा मेट्रो प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : पालिका अभियंत्याकडे ५५ लाखांच्या खंडणीची मागणी; सहा जणांना अटक, खंडणी विरोधी पथकाची कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘मेट्रो २ ब’ मार्गिकेतील कारशेडच्या कामाने वेग घेतला असून डिसेंबर २०२४ पर्यंत कारशेडचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र त्याचवेळी ‘मेट्रो ४’मधील पहिला टप्पा, ‘मेट्रो ४ अ’ मार्गिका आणि ‘मेट्रो ९’मधील पहिला टप्पा २०२६ मध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन असताना या मार्गिकांसाठीची कारशेड या कालावधीत पूर्ण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे या मार्गिका सेवेत कशा दाखल करणार याविषयी एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी ‘मेट्रो ९’च्या पहिल्या टप्प्यासाठी चारकोप कारशेडचा वापर केला जाणार असल्याचे सांगितले. तर ‘मेट्रो ४’मधील पहिल्या टप्प्यासाठी आणि ‘मेट्रो ४ अ’साठी पर्यायी व्यवस्था केली जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.