मुंबई : मुंबईमधील आकर्षणांपैकी एक असलेल्या गेट वे ऑफ इंडियाला भुयारी मेट्रोतून जाण्याचे मुंबईकरांचे, पर्यटकांचे स्वप्न येत्या काही वर्षात पूर्ण होणार आहे. मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसी) आणिक आगार – गेट वे ऑफ इंडियादरम्यान भुयारी मेट्रो ११ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला असून या प्रस्तावाला मंजुरीची प्रतीक्षा आहे. राज्य सरकारची परवानगी मिळताच या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी घेऊन भुयारी मेट्रो ११ च्या कामास सुरुवात करण्यात येणार आहे. ही भुयारी मेट्रो १७.५१ किमी लांबीची असणार असून या मेट्रो मार्गिकेमुळे शीव, वडाळा, शिवडी, भायखळा, भेंडी बाजारसारखे परिसर जोडले जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
एमएमआरसीने हाती घेतलेले कुलाबा – वांद्रे – सीप्झ – आरे मेट्रो ३ मार्गिकेचे काम येत्या काही महिन्यात पूर्ण होईल आणि ही संपूर्ण मेट्रो मार्गिका सेवेत दाखल होईल. मेट्रो ३ मार्गिकेचे काम लवकरच संपुष्टात येणार असल्याने आता एमएमआरसीने मेट्रो ११ मार्गिकेच्या कामाला सुरुवात करण्याच्यादृष्टीने विचार सुरू केला आहे. त्यानुसार काही महिन्यांपूर्वी मेट्रो ११ मार्गिकेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून या प्रस्तावाला मंजुरीची प्रतीक्षा आहे. लवकरच प्रस्तावास मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा एमएमआरसीला आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतर मेट्रो ११ चा प्रस्ताव केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर पुढील कार्यवाही पूर्ण करून मेट्रो ११ मार्गिकेची निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरसीतील अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी बराच काळ लागणार आहे. मात्र या मेट्रो मार्गिकेमुळे मुंबई शहरातील अनेक महत्त्वाचे परिसर मेट्रोने जोडले जाणार असून ही मार्गिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
एमएमआरसीच्या प्रस्तावानुसार, या १७.५१ किमी लांबीच्या मार्गिकेवर १४ मेट्रो स्थानकांचा समावेश असणार आहे. १४ पैकी १३ मेट्रो स्थानके भुयारी असणार असून एक स्थानक जमिनीवर असणार आहे. ही मार्गिका सेवेत दाखल झाल्यास यावरून सहा डब्यांच्या मेट्रो ताशी ८० किमी वेगाने धावेल. तर या मार्गिकेवरून २०३१ मध्ये दिवसाला पाच लाख ८० हजार प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज एमएमआरसीने व्यक्त केला आहे. २०५५ पर्यंत दैनंदिन प्रवासी संख्या १० लाख १२ हजारांवर जाईल, असा दावा एमएमआरसीने केला आहे.
१४ स्थानके अशी
आणिक आगार, वडाळा आगार, सीजीएस वसाहत, गणेश नगर, बीपीटी रुग्णालय, शिवडी, हे बंदर, दारुखाना, भायखळा, नागपाडा जंक्शन, भेंडी बाजार, सीएसएमटी, हाॅर्मिनल सर्कल आणि गेट वे ऑफ इंडिया.
१६ हेक्टर जागेवर कारशेड
मेट्रो ११ मार्गिकेसाठी आणिक-प्रतीक्षा नगर आगाराच्या जागेवर कारशेड प्रस्तावित करण्यात आली आहे. या कारशेडसाठी १६ हेक्टर जागेची गरज आहे.