मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या अखत्यारीतील १४९ दुकानांच्या ई लिलावाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सोमवारी म्हाडा उपाध्यक्षांनी ई लिलावाच्या प्रस्तावास मान्यता दिल्याने आता आठवड्यात जाहिरात काढत नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. महाग असल्याने विक्री न झालेल्या १२४ दुकानांच्या ई लिलावात या दुकानांच्या बोली दरात घट करण्यात आली आहे. निवासी रेडीरेकनर दराच्या दोन पट दराऐवजी आता दीड पट दराने बोली दर निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे परवडणार्या दरात मुंबईत दुकान खरेदी करण्याची संधी आता मुंबईकरांना मिळणार आहे.
म्हाडाच्या गृहप्रकल्पात रहिवाशांना आवश्यक त्या सुविधा अर्थात, पिठाची गिरणी, बँक, भाजी मार्केट, औषधाचे दुकान आदी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून काही दुकाने बांधली जातात. या दुकानांची विक्री ई लिलावाद्वारे केली जाते. मंडळाकडून दुकानांची बोली निश्चित केली जाते त्या बोलीपेक्षा सर्वाधिक बोली लावणारा अर्जदार विजेता ठरतो आणि त्याला दुकानाचे वितरण केले जाते. त्यानुसार आतापर्यंत शेकडो दुकानाचा ई लिलाव मुंबई मंडळाकडून करण्यात आला आहे. जून २०२४ मध्ये मुंबई मंडळाने १७३ दुकानांचा ई लिलाव केला होता. मात्र या दुकानांच्या ई लिलावास प्रतिसाद मिळाला नाही. त्यावेळी १७३ पैकी केवळ ४९ दुकानांची विक्री झाली तर १२४ दुकाने रिक्त राहिली.
रिक्त दुकाने आणि पवईसह अन्य एका ठिकाणच्या उपलब्ध झालेल्या २५ दुकानांसह एकूण १४९ दुकानांचा ई लिलाव करण्याचा निर्णय मुंबई मंडळाने घेतला. त्यानुसार या ई लिलावाचा प्रस्ताव मान्यतेसाठी म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावास जयस्वाल यांनी सोमवारी मान्यता दिल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली.
मुंबईतील १४९ दुकानांपैकी जुन्या न विकल्या गेलेल्या १२४ दुकानांची बोली किंमत अधिक असल्याने प्रतिसाद मिळाला नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुकानांच्या किंमतीत काही घट केल्याचेही बोरीकर यांनी सांगितले. दुकानांसाठी निवासी मालमत्तेच्या रेडीरेकनर दराच्या दोन पट किंवा अनिवासी मालमत्तेच्या रेडीरेकनर दराच्या एक पट ज्या दर अधिक असेल तो दर लागू केला जातो. पण गेल्यावर्षी दुकाने विकली न गेल्याने १२४ दुकानांसाठी निवासी मालमत्तेच्या रेडीरेकनर दराच्या दीड पट दर लावत बोली दर निश्चित करण्यात आल्याचेही बोरीकर यांनी सांगितले. तर दर कमी झाल्याने यावेळी दुकाने विकली जातील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
त्याचवेळी बिंबिसारनगर सह अन्य काही ठिकाणची दुकाने निश्चित वापरासाठी राखीव होती. बँक, एटीएम,व्यायामशाळा, कर्तनालय यासह अन्य वापरासाठी दुकाने राखीव असल्यानेही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे नियमात सुधारणा करत वापराबाबतची अटही काढून टाकण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. १४९ दुकानांच्या ई लिलावास मान्यता मिळाल्याने आठवड्याभरात जाहिरात प्रसिद्ध करत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे.
कुठे-कुठे दुकाने
गव्हाणपाडा, चुनाभट्टी, तुंगा पवई, कोपरी पवई, चारकोप, जुने मागाठाणे, महावीर नगर, प्रतीक्षा नगर, मालवणी, बिंबिसार नगर येथील ही दुकाने आहेत. या दुकानांमध्ये १२५ चौ. फुटापासून १५०० चौ. फुटापर्यंतच्या दुकानांचा समावेश आहे.