मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सप्टेंबर २०२४च्या सोडतीतील घरांच्या किमती नेहमीप्रमाणे याही वर्षी चढ्या आहेत. मात्र यावेळी अल्प गटातील घरांच्या किमतीने कोटींचा पल्ला पार केला आहे. वरळीतील अल्प गटातील घराची किंमत चक्क दोन कोटी ६२ लाख १५ हजार ५३९ रुपये आहे.

महिना ७५ हजार रुपये उत्पन्न असणाऱ्यांना हे घर कसे परवडणार, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. तर मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाला मिळालेल्या घरांच्या किमती अवाच्या सवा आहेत. त्यामुळे ही घरे सर्वसामान्य विजेत्यांना परवडणारी नाहीत.

हेही वाचा – झोपडीवासीयांचे भाडे थकवणारा विकासक काळ्या यादीत, गुन्हाही दाखल! प्राधिकरणाकडून प्रथमच कठोर कारवाई

मुंबई मंडळाच्या २०३० घरांच्या सोडतीसाठी शुक्रवारपासून अर्ज विक्री – स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली. ही प्रक्रिया ४ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. तर १३ सप्टेंबरला सोडतीचा निकाल जाहीर होणार आहे. मुंबईत म्हाडाची घरे ही अत्यल्प आणि अल्प गटासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. दोन्ही गटातील इच्छुक सोडतीकडे डोळे लावून होते. पण आज अर्ज विक्री – स्वीकृतीस सुरुवात झाल्यानंतर मात्र किंमत पाहूनच त्यांची मोठी निराशा झाली.

वडाळा आणि इतर ठिकाणची अल्प गटातील घरेही दीड ते दोन कोटींच्या घरातील आहेत. नऊ लाख रुपये असे वार्षिक (दरमहा ७५ हजार रुपये) कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या अर्जदारांना वा पुढे विजेत्यांना ही घरे कशी परवडणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा – महापालिकेचे नवीन जाहिरात फलक धोरण, हरकती व सूचनांसाठी १५ दिवस

दरम्यान, दुरुस्ती मंडळाकडून या सोडतीसाठी शहरातील ८९ घरे उपलब्ध झाली आहेत. मागील सोडतीत ही काही घरे दुरुस्ती मंडळाकडून उपलब्ध झाली होती. त्यावेळी या घरांच्या किमती भरमसाट होत्या. ताडदेवमधील सात घरे चक्क साडेसात कोटी रुपयांची होती. ही किंमत उच्च गटालाही न परवडल्याने सातपैकी एकही घर २०२३ च्या सोडतीत विकले गेले नाही. हे घर यावेळी पुन्हा सोडतीत समाविष्ट करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेडीरेकनरनुसार दरनिश्चिती

याबाबत मुंबई मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता या घराच्या क्षेत्रफळानुसार घर अल्प गटात समाविष्ट झाले आहे. तर दुरुस्ती मंडळाकडून प्राप्त झालेल्या घरांच्या किमती या संबंधित ठिकाणच्या रेडीरेकनर दराच्या ११० टक्के दराने निश्चिती केली जाते. त्याप्रमाणे किंमत निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.