मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मुंबईत मेट्रोचे जाळे उभारत आहे. सध्या काही मेट्रो मार्गिकांची कामे सुरू असून काही मार्गिकांची कामे लवकरच सुरू होणार आहेत. असे असताना काम सुरू असलेल्या आणि कामे सुरू होणाऱ्या मेट्रो मार्गिकांसाठी कर्जाच्या माध्यमातून निधी उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने नुकतीच सहा मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी कर्ज हमीस मंजूर दिली आहे. त्यामुळे आता चालू मेट्रो मार्गिकांच्या कामालाही गती मिळणार आहे.

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय उपलब्ध करून देत वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी ३३७ किमीचे मेट्रोचे जाळे विणले जात आहे. यापैकी काही मेट्रो मार्गिका पूर्ण झाल्या असून वाहतूक सेवेत दाखल आहेत. तर काही मार्गिकांची कामे सुरू असून काही मार्गिकांची कामे सुरू होणार आहेत. अशा वेळी एमएमआरडीएच्या पाच आणि मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनकडून (एमएमआरसी) उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित वडाळा – सीएसएमटी मेट्रो ११ मार्गिकेसाठी राज्य सरकारने कर्ज हमीस मंजुरी दिली आहे.

‘ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो ५’, ‘स्वामी समर्थनगर – विक्रोळी मेट्रो ६’, ‘दहिसर पूर्व – मीरा भाईंदर मेट्रो ९’, ‘गायमुख – शिवाजी चौक मेट्रो १०’ आणि ‘वडाळा – सीएसएमटी’ या सहा मेट्रो मार्गिकांसाठीच्या कर्ज हमीचा यात समावेश आहे. या सर्व मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे. यातील काही मार्गिका उन्नत आहेत, काही भुयारी आहेत. भुयारी मेट्रो मार्गिकांचा खर्च अधिक आहे. त्यामुळे मेट्रो मार्गिकांच्या निधी उभारणीचे आव्हान एमएमआरडीए आणि एमएमआरसीसमोर आहे. अशा वेळी कर्ज उभारणीतून हा निधी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कर्ज उभारणीसाठी राज्य सरकारची हमी आवश्यक होती. राज्य सरकारने सहा मार्गिकांच्या कर्ज हमीस नुकतीच मंजुरी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य सरकाने सहा मेट्रो मार्गिकांच्या कर्ज उभारणीस मान्यता दिल्याने आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून कर्ज उभारणी करणे एमएमआरडीए, एमएमआरसीला शक्य होणार आहे. त्यानुसार लवकरच एमएमआरडीएकडून पाच मार्गिकांसाठी कर्ज उभारणी केली जाणार आहे. निधी अपुरा पडल्याने प्रकल्पास विलंब होतो, विलंब झाल्याने खर्च वाढतो. पण आता मात्र आवश्यक निधी उपलब्ध होणार असल्याने मेट्रो प्रकल्पास अर्थबळ मिळेल आणि कामाला वेग येईल.