मुंबई : पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव स्थानकात एका महाविद्यालयीन तरुणीची भर दिवसा छेड काढल्याची घटना घडली. तिच्या मित्राने गुरूवारी समाजमाध्यमावर याबाबात माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी संबंधित तरुणीचा जबाब नोंदवून पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती बोरिवली रेल्वे पोलिसांनी दिली. या प्रकारामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल महिलांसाठी असुरक्षित बनू लागली आहे. गोरेगाव येथे राहणार्या १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीची रेल्वे स्थानकात छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला आहे. तिच्या मित्राने घडलेल्या प्रसंगाबाबत गुरूवारी समाजमाध्यमार एक पोस्ट प्रसारित केल्यानंतर या प्रकरणाची माहिती समोर आली. पीडित तरुणी गोरेगाव येथे राहते आणि विलेपार्ले येथील महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकते. बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तिने विलेपार्ले येथे जाणारी ट्रेन पकडली. ती पहिल्या श्रेणीच्या डब्यात बसली होती. त्यावेळी एक तरुण खिडकीजवळ आला आणि ल्याने या तरुणीला उद्देशून असभ्य वक्तव्य केले. ही तरुणी खिडकीपासून मागे गेली. मात्र तो इसम तिच्याकडे पाहत अश्लील संभाषण करीत होता. या तरुणीने आपला मोबाइल काढून त्याचे चित्रण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी डब्यात अन्य दोन महिला होत्या.
हा विकृत इसम डब्यात शिरला असता तर काय झाले असते, असा सवाल या तरुणीच्या मित्राने आपल्या पोस्ट मध्ये केला आहे. रेल्वे महिलांसाठी सुरक्षित असल्याचा दावा केला जातो. परंतु अशा अनेक घटना वारंवार घडत आहेत. माझी मैत्रीण दररोज सकाळी महाविद्यालयात जाते. दिवसाढवळ्या असा प्रकार घडत असेल तर पुढच्या अनर्थाची कल्पनाच न केलेली बरी, असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
या प्रकाराबाबत समाज माध्यमावरून माहिती समजली. आम्ही सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण तपासत आहोत. तसेच संबंधित तरुणीशी संपर्क साधून याबाबत तिचा जबाब नोंदवून पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती बोरिवली रेल्वे पोलिसांनी दिली.