मुंबई : चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेवरील मोनोरेल गाडी सोमवारी सकाळी तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली होती. या गाडीतील १७ प्रवाशांना महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाच्या (एमएमएमओसीएल) अधिकारी-कर्मचार्यांनी सकाळी ७.४० वाजता सुखरुप बाहेर काढले. मात्र तांत्रिक बिघाड असल्याने मोनोरेल गाडी बराच वेळ एकाच जागी अडकून होती. त्यामुळे वडाळा ते जेकब सर्कल मार्गिकेवरील सेवा विस्कळीत झाली होती. तब्बल दोन तासानंतर गाडीतील बिघाड दुरुस्त करत गाडी पुढे नेण्यात आली. त्यानंतर वडाळा ते जेकब सर्कल सेवा पूर्ववत झाली.
सोमवारी सकाळी वडाळा ते जेकब सर्कल मार्गिकेवरुन धावणारी मोनोरेल गाडी तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. या घटनेची माहिती मिळताच एमएमएमओसीएलच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर तात्काळ अग्निशमन दलाला बोलावले. मात्र अग्निशमन दल येण्याआधीच एमएमएमओसीएलच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समोरच्या रुळावर दुसरी गाडी आणून बंद गाडीतील प्रवाशांना बाहेर काढले आणि दुसऱ्या गाडीने पुढील स्थानकावर सुखरुप नेले. सकाळी ७.३० वाजता प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर गाडीतील बिघाड दुरुस्त करून बंद गाडी पुढे नेण्यात आली.
मात्र त्यामुळे दोन तास वडाळा ते जेकब सर्कल मार्गिकेवरील सेवा पूर्ववत झाली. सध्या मोनोची सेवा सुरळीत सुरु असल्याची माहिती एमएमएमओसीएलने दिली आहे. प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. दरम्यान प्रवाशांनी मात्र मोनोरेल सेवेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. पावसात रेल्वे रुळावर पाणी भरते त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत होते. अशावेळी हार्बर मार्गिकेवरील प्रवासी उन्नत मोनोरेल मार्गिकेचा पर्याय स्वीकारतात. सुकर प्रवासासाठी निवडलेली मोनोरेलच बंद पडल्याने प्रवाशांच्या अडचणी वाढतात. त्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होताना दिसते.
आॅगस्टमध्ये दोन मोनोरेल गाड्या अतिवजनामुळे गाडीतील वीज पुरवठा खंडीत होऊन बंद पडल्या होत्या. एका गाडीतील प्रवाशांना अग्निशमन दलाला गाडीचा दरवाजा तोडून बाहेर काढावे लागले होते. या घटनेची चौकशी अजूनही सुरु असून याप्रकरणी एमएमएमओसीएलच्या दोन उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. अशात सोमवारी पुन्हा गाडी बंद पडली. यावेळी १७ प्रवासी असतानाही गाडी कशी बंद पडली असा प्रश्न आता प्रवाशांकडून यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. तर नेमक्या कोणत्या कारणाने गाडी बंद पडली हे लवकरच सांगण्यात येईल असे एमएमएमओसीएलकडून सांगण्यात आले आहे.