मुंबई : शहर आणि उपनगरांमध्ये यंदाच्या पावसाळ्यात जुलै अखेरपर्यंत पावसाचे चित्र विभागनिहाय वेगळे दिसले. हवामान विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सांताक्रूझमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून, दादर, पनवेल आणि डोंबिवली परिसरातही समाधानकारक पाऊस झाला आहे. शहरात काही भागात सरासरीच्या जवळपास मजल मारली असली, तरी काही विभाग मात्र अद्याप पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

हवामान विभागाच्या अहवालानुसार, शहर आणि उपनगरांमध्ये पावसाचे प्रमाण विभागानुसार वेगवेगळे असून काही भागांत अपेक्षेपेक्षा अधिक, तर काही भागांत कमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत १ जून ते ३१ जुलैपर्यंत सांताक्रूझ येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तेथे १३१० मिमी पाऊस नोंदला गेला आहे. त्याखालोखाल दादर येथे १२४४ मिमी, बोरिवली ११५७ मिमी, सीएसएमटी ११२१ मिमी आणि कुलाबा येथे ९७३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

कुलाबा येथे सर्वात कमी पाऊस नोंदला गेला आहे. दरम्यान, यंदा मुंबईत मोसमी पाऊस लवकर दाखल झाला असला तरी पावसाचे प्रमाण तुलनेने कमी होते. जून आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीला फारसा पाऊस पडलेला नाही. महिन्याच्या अखेरीस दोन तीन दिवस पाऊस पडलेला आहे. ऑगस्ट महिन्यातही दुसऱ्या आठवड्यानंतर पाऊस सक्रिय होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

इतर भागातील पावसाची नोंद

ठाणे – १५१० मिमी

ऐरोली- १५६१ मिमी

रबाळे – १४४६ मिमी

बेलापूर – १६१८ मिमी

उरण – १४३५ मिमी

भिवंडी – १३६७ मिमी

टिटवाळा – १४८७ मिमी

कल्याण – १५१८ मिमी

डोंबिवली – १५९३ मिमी

उल्हासनगर – १४५० मिमी

बदलापूर – २०४४ मिमी

पनवेल – १५८३ मिमी

वसई – ११८२ मिमी

विरार – १२०३ मिमी

पालघर – ११८२ मिमी

डहाणू – ११६७ मिमी 

मुंबईत जून, जुलैपेक्षा मे महिन्यात सर्वाधिक

यंदा मे महिन्यातच मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली होती. १ ते ३१ मे या कालावधीत ८८१.६ मिमी पावसाची नोंद झाली. यंदा हवामानातील बदलांमुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये मे महिन्यात नेहमीपेक्षा जास्त पडलेला वळवाचा पाऊस आणि त्यानंतर लवकरच दाखल झालेला मोसमी पाऊस यामुळे संपूर्ण मे महिन्यात ८८१.६ मिमी पावसाची नोंद झाली.मे मध्ये हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ५०३.२ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ३७८.४ मिमी पावसाची नोंद झाली. यापूर्वी १९१८ मध्ये १ ते ३१ मे दरम्यान २७९.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर तब्बल १०७ वर्षांनी यंदा मे महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात पावसाची उघडीप

मोसमी पावसाला पोषक वातावरण नसल्याने सध्या राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. काही भागात अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत. पावसाने उघडीप देताच राज्यात तापमानाचा पारा वाढला आहे. अनेक भागात कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस दरम्यान आहे. यामुळे पुन्हा उकाड्यात वाढ झाली असून उन्हाचा तापही जाणवत आहे.

ऑगस्टमध्ये कमी पाऊस

राज्यात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागात पावसाचे प्रमाण सरासरीइतके राहील. तर, कोकण, खानदेशात सरासरी किंवा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील सर्वच भागात पावसाचे प्रमाण कमी राहील. त्यानंतर साधारण दुसऱ्या आठवड्यानंतर पावसाचे प्रमाण वाढेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात म्हणजेच मोसमी पावसाच्या दुसऱ्या टप्प्यात सरासरीच्या १०६ टक्के पावसाचा अंदाज आहे.