Mosques New Idea for Azaan: ध्वनी प्रदूषणावर मात करण्यासाठी न्यायालयाने सर्वच धार्मिक आस्थापनांवरील लाऊडस्पिकर आणि भोंग्यावर कडक निर्बंध आणण्याचे निर्देश दिल्यानंतर सरकारनेही कडक उपाययोजना राबविल्या आहेत. त्यामुळे मुंबई शहरातील मशिदींनी आता भोंग्यांना पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. काही मशिदींनी तर भोंग्याशिवाय अजान देत जास्तीत लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नही केला आहे. हिंदुस्तान टाइम्स इंग्रजी वृत्त संकेतस्थळाने याबाबतचे सविस्तर वृत्त दिले आहे.
ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई शहरात धार्मिक आस्थापनांवरील १,६०८ भोंग्यांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. यापैकी १,१४९ भोंगे मशिदीवरील होते, तर ४८ मंदिरावरील, १० चर्च आणि १४७ गुरुद्वारील भोंगे होते. सदर माहिती विधिमंडळात देण्यात आली आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात मुंबई लाऊडस्पिकर मुक्त केल्याचाही दावा केला होता.
पोलिसांनी लाऊडस्पिकर, भोंग्यावर कारवाई केल्यामुळे धार्मिक स्वातंत्र्याच्या मुलभूत अधिकाराचे उल्लंघन होत असल्याच्या याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. असे असतानाही काही मशिदींनी मात्र तंत्रज्ञानाची कास धरत नाविन्यपूर्ण पर्यायांचा विचार सुरू केला आहे. काही मशिदींनी मोबाइल अॅप्लिकेशनचा वापर सुरू केला आहे. मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर येथील एका सोसायटीने तर इमारतीच्या फ्लॅटमध्येच स्पीकर बसवले आहेत, जे जवळच्या मशिदीशी जोडलेले आहेत.
मानखुर्द येथील सोसायटीत स्पीकर बसविण्यात पुढाकार घेणाऱ्या रझाक शेख यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सांगितले की, फ्लॅटमधील स्पीकर आमच्या मशिदीशी जोडले गेलेले आहेत. इथे अजान सुरू होताच, ती घरोघरी ऐकायला मिळते. या युक्तीमुळे आता अजानवर इतरांचा आक्षेप घेण्याचा प्रश्न उरणार नाही.
शेख पुढे म्हणाले की, पोलिसांची भोंग्यावर कारवाई होईल, याची त्यांना कल्पना होती. त्यामुळे त्यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर पासूनच घरांमध्ये साऊंड सिस्टम बसविण्यास सुरुवात केली. सध्या तब्बल ५० घरांमध्ये अजान ऐकली जाते.

दुसरा पर्याय आहे मोबाइल अॅप्लिकेशनचा. तमिळनाडूमधील तिरुनेलवेली येथे विकसित केलेले मोबाइल अॅप मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. मुंबईतीही दोन डझनहून अधिक मशिदींनी याचा वापर सुरू केला आहे. ज्यामध्ये माहिमची जुमा मशीद आणि मदनपुरा येथील सुन्नी बडी मशीद यासारख्या प्रमुख मशिदींचा समावेश आहे.