मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगरमधील रहिवाशांना सेवाशुल्काच्या थकबाकीची देयके म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून पाठविली जात आहेत. २०२१ ते २०२३ पर्यंतची सेवाशुल्काच्या थकबाकीची ३५ हजार रुपयांचे देयके पाहून रहिवाशी हवालदिल झाले आहेत. ही सेवाशुल्क केव्हा झाली आणि त्याची माहिती रहिवाशांना का देण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित करत रहिवाशांनी वाढीव सेवाशुल्क रद्द करण्याची मागणी मुंबई मंडळाकडे केली आहे.

म्हाडा वसाहतीतील रहिवाशांना पाणी पुरवठ्यासह इतर सोयी उपलब्ध करुन देण्याच्या मोबदल्यात मुंबई मंडळाकडून सेवाशुल्क आकारले जाते. त्यानुसार मोतीलाल नगरमधील सदनिकांसाठी महिन्याला २८८ रुपये सेवाशुल्क आकारले जाते. सेवाशुल्काची देयके आता रहिवाशांना ऑनलाईन येताता. त्यानुसार ऑगस्ट महिन्यासाठीची देयके पाहून रहिवाशी हवालदिल झाले आहेत. कारण या देयकांनुसार २८८ रुपये महिना असे असलेले सेवाशुल्क थेट १६०० रुपये नमूद करण्यात आले आहे.

महत्त्वाचे म्हणजे या देयकांमध्ये २०२१ ते २०२३ या वर्षांसाठीची ३५ हजार रुपयांची थकबाकी नमूद करण्यात आली आहे. तर २०२३ ते २०२५ पर्यंतचीही थकबाकीची देयके यापुढे मुंबई मंडळाकडून पाठविली जाण्याची शक्यता आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता ही देयके पाठविण्यात आल्याने रहिवाशांमध्ये नाराजी असल्याची माहिती मोतीलाल नगर विकास समितीचे निलेश प्रभू यांनी दिली.

तर सेवाशुल्क वाढ का आणि कशासाठी असा प्रश्न विचारत प्रभू यांच्यासह रहिवाशांनी वाढीव सेवाशुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. वाढीव शुल्काबाबत प्रभू यांनी ई मेलद्वारे मुंबई मंडळाकडे स्पष्टीकरण मागितले आहे. मात्र यावर अद्याप स्पष्टीकरण मंडळाकडून आलेले नाही. त्यात थकबाकी अदा करण्याची मुदत शनिवारी संपणार आहे. तेव्हा ही थकबाकी भरावी की नाही या संभ्रमात रहिवाशी आहेत. ही थकबाकी भरली नाही तर रहिवाशांना थकबाकीच्या रक्कमेवर दोन टक्के व्याज लागणार असल्याने रहिवाशांची चिंता वाढली आहे.

याविषयी मुंबई मंडळाच्या संबंधित मिळकत व्यवस्थापकांना विचारले असता त्यांनी अधिक माहिती देणे टाळले. मात्र यावर चर्चा सुरु असून लवकरच यासंबंधी निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले. वाढीव शुल्क रद्द झाले नाही तर रहिवाशी रस्त्यावर उतरतील असा इशाराही रहिवाशांनी दिला आहे.