मुंबईत विशेष पोक्सो कायद्याअंतर्गत एका ३२ वर्षीय व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने १ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. या व्यक्तीने अल्पवयीन मुलीच्या ओठांवर १०० रुपयांची नोट फिरवली आणि तिला म्हणाला “मी तुला लाईक करतो, तू इतका भाव का खातेस?” पोलिसांनी याप्रकरणी अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून लैंगिक शोषण केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई केली आहे.
३२ वर्षीय आरोपीला शिक्षा सुनावताना न्यायलयाने त्याच्या कुटुंबाचा देखील विचार केला आहे. त्याचं कुटुंब त्याच्यावर अवलंबून आहे. त्याची आई कर्करोगाने त्रस्त आहे. त्यामुळे विशेष न्यायाधीशी एस. सी. जाधव म्हणाले की, हे न्यायालयाचं कर्तव्य आहे की, “गुन्ह्याचं गांभीर्य आणि शिक्षेची मागणी या दोन्ही गोष्टींचा विचार करायला हवा.” विशेष सरकारी विधीज्ञ विणा शेलार यांनी आरोपीला शिक्षा देण्यासाठी ज्या साक्षीदारांचा आधार घेतला, त्यामध्ये पीडित मुलगी, तिची आई आणि त्यांचे शेजारी यांचा समावेश आहे.
१६ वर्षीय पीडित मुलीने न्यायालयाला सांगितलं की, १३ जुलै २०१७ रोजी रात्री आठ वाजता ती तिच्या शेजाऱ्यांसोबत बाजारात गेली होती. तेव्हा एका व्यक्तीने तिचा पाठलाग केला. रस्त्यात तिला अडवलं आणि तिच्या जवळ आला. तिच्या ओठांना शंभराची नोट लावली. तेव्हा त्या मुलीने त्याच्याकडे पाहिलं. त्यावर तो व्यक्ती म्हणाला की, “तू असं का करतेस, इतका भाव का खातेस?” त्यानंतर ती मुलगी घरी गेली आणि तिने तिच्या आईला सर्व हकीकत सांगितली.
हे ही वाचा >> ब्रेकअपच्या धमकीमुळे लिव्ह इन पार्टनरला संपवत मृतदेहासोबत घालवल्या तीन रात्री, ‘या’मुळे गेला थेट तुरुंगात
आरोपीने धमकावलं होतं
मुलीने सांगितलेलं सर्व काही ऐकल्यानंतर आई आणि मुलगी दोघींनी थेट पोलीस ठाणं गाठलं. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. पीडित मुलीने सांगितलं की, आरोपी कॉलजेला जाताना तिचा पाठलाग करायचा, शिट्टी वाजवायचा, टोमणे मारायचा, तसेच त्याने तिला आणि तिच्या आईला चाकूने भोसकवून मारण्याची धमकी देखील दिली होती. त्यानंतर पीडित मुलीच्या शेजाऱ्यांनी याची पुष्टी केली.